लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्व सरकारी कराचा भरणा करून दुकान चालविणारे व्यापारी व दुसरीकडे कोणताही कर न भरता रस्त्यावर स्वस्त मस्त कपडे विकणारे हातगाडीवाले यांच्यातील वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुकानासमोरच हातगाडी आडव्या लावल्याने दुकानात ग्राहक येणे टाळत आहेत. यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने पैठणगेट परिसरातील व्यापारी संतापले. रस्त्यावरील हातगाडीवाल्यांविरोधात कारवाई न करणा-या महानगरपालिका व पोलीस आयुक्त यांचा निषेध करीत व्यापा-यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक आपल्या दुकानासमोरील लाइट बंद करून टाकले. यामुळे परिसरात रस्त्यावर अंधार पसरला होता.दिवाळीमुळे शहरातील कपड्यांची मुख्य बाजारपेठ पैठणगेट ते टिळकपथ या रस्त्यावर मोठी वर्दळ होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही येथे फायदा झाला नाही. कारण हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर कब्जा केल्याने रुंद रस्ता अरुंद झाला आहे. दुकानासमोर आडव्या हातगाड्या लावून व्यवसाय करणा-या हातगाडीवाल्यांमुळे येथील कपडा व्यापारी हैराण झाले आहेत. कारण हातगाड्यांचा अडथळा पार करीत दुकानात जाणे ग्राहक नापसंत करीत आहेत. यामुळे दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. मंगळवारीही या रस्त्यावर शेकडो हातगाड्या उभ्या होत्या.‘रस्ते का माल सस्ते मे,’ असे ओरडत हातगाड्यावर शर्ट-पँट विक्री केली जात होती. दिवाळी असूनही ग्राहकी कमी झाल्याने येथील कपडे व्यापा-यांमध्ये संतापाची लाट पसरली. सर्व व्यापा-यांनी सायंकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान एकत्र येऊन महानगरपालिका व पोलीस आयुक्तांचा निषेध केला व दुकानासमोरील लाइट बंद करून टाकली. यामुळे रस्त्यावर अंधार पसरला होता.मनपाच्या पथदिव्यांच्या उजेडात हातगाडीवाले व्यवसाय करीत होते. याचा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागला. गंभीर परिस्थिती लक्षात घेता रात्री १०.३० वाजेदरम्यान पोलीस आले व त्यांनी रस्त्यावरील हातगाड्या हटविल्या व दुकानदारांना लाइट सुरू करण्याची विंनती केली. विनंतीला मान देऊन व्यापा-यांनी १०.४२ वाजता दुकानासमोरील लाइट पुन्हा सुरू केले व रस्ते उजाळून निघाले. यावेळी परिसरातील ५० पेक्षा अधिक व्यापारी रस्त्यावर उतरले होते.
व्यापा-यांचे लाइट बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:49 AM