सोयगाव : जरंडी गावात मंगळवारी रात्री एकापाठोपाठ एक अशा तीन विजा कडाडून बॉम्बसदृश आवाज आला. आवाजापाठोपाठ हादरेही बसू लागल्याने जरंडीसह परिसरातील चार गावांचे नागरिक भयभीत झाले होते.
आवाजामुळे बसलेल्या हादऱ्यामुळे घरातील वस्तू आणि घरासमोरील वाहने पडल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. निंबायती, रामपुरातांडा, न्हावीतांडा, माळेगाव, पिंपरी या गावांमध्येही हादरा जाणवला. यामुळे अनेक गावकऱ्यांनी भेदरलेल्या अवस्थेत रात्र जागून काढली होती.
जरंडीच्या हुतात्मा स्मारक रोहित्रावर या विजांचा स्फोट झाल्याने एक रोहित्र जळाले तर तीन रोहीत्रांच्या डिस्क फुटल्या. त्यामुळे जरंडीच्या काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे सहायक अभियंता अभिजित गौर, वीजमन पप्पू पाटील यांनी रात्रीच काही गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला. परंतु रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या भीज पावसामुळे काही भागांचा वीज पुरवठा सुरळीत होण्यास बुधवारी पहाटेपर्यंत वाट पहावी लागली.