लोणी खुर्द : वैजापूर तालुक्यातील वाकला येथे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे रोहित्राची तार तुटून ओल्या जमिनीत उतरलेल्या वीज प्रवाहाचा जोरदार धक्का लागून शेडमध्ये बांधलेल्या दोन म्हशी, एक बैल व एक बकरी अशा चार जनावरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. यात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
वाकला येथील शेतकरी उत्तम चव्हाण यांनी जातेगाव रोडलगत स्वत:च्या जागेत जनावरांना बांधण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. शेडच्या शेजारीच महावितरण कंपनीचे रोहित्र आहे. महावितरणकडून देखभाल दुरुस्तीअभावी या रोहित्राची दुरवस्था झाली आहे. हे धोकादायक रोहित्र इतरत्र हलविण्याची मागणी उत्तम चव्हाण यांनी यापूर्वी अनेक वेळा केली होती. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातत्याने याकडे दुर्लक्ष केले. याचा प्रचंड फटका शेतकरी चव्हाण यांना बसला आहे. गुरुवारी पाऊस सुरु असताना सकाळी ११ वाजेच्या दरम्यान रोहित्रातील बॉक्समधील एक विद्युत प्रवाहित तार तुटून जमिनीवर पडली. यामुळे वाहत्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरला. हे पाणी चव्हाण यांची जनावरे बांधलेल्या शेडखालून जात असल्याने शेडमध्ये बांधलेल्या दोन म्हशी, एक बैल व एका बकरीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. यातील एक म्हैस गाभण होती. घटनेची माहिती मिळताच शिऊर महावितरण कंपनीचे अभियंता मोरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. लोणी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर खान यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले. आठ दिवसांत रोहित्र दुसऱ्या ठिकाणी हलवू, तसेच शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन मोरे यांनी यावेळी दिले.
चौकट
यापूर्वीही घडली होती घटना
या रोहित्रामुळे असाच विजेचा धक्का लागण्याचा प्रकार मागील महिन्यात घडला होता. त्यावेळी जनावरांना व चव्हाण यांच्या नातवाला विजेचा धक्का लागला होता. सुदैवाने त्यात ते बचावले होते. यानंतर चव्हाण यांनी वायरमन तसेच शिऊर येथील महावितरणच्या कार्यालयाला कळविले होते, तसेच रोहित्र इतरत्र हलविण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना केवळ आश्वासन मिळाले. महावितरणने दखल न घेतल्याने वाकला ग्रामपंचायतने सदर रोहित्राला तारेचे कंपाऊंड करुन दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्याचवेळी दखल घेतली असती, तर चव्हाण यांचे मोठे नुकसान टळले असते.