लातूर : भावाच्याच लहान मुलीच्या चेहऱ्यावर डागण्या देत विद्रुप करुन तिला भीक मागायला भाग पाडणाऱ्या कविता शिंदे हिला लातूरच्या न्यायालयात हजर करताना, पोलिसांच्या हाताला हिसका देत तिने पलायन केल्याची घटना घडली होती. दरम्यान, कविता शिंदे ही वेशांतर करीत आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातून पोलिसांना गुंगारा देत फिरत होती. अखेर मोबाईल लोकेशनवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तिला अटक केली आहे. कविता शिवाजी शिंदे ही महिला मुळची सुगाव (ता. चाकूर) येथील आहे. लातूर शहरानजीक बाभळगाव रोडवर ती सध्याला राहत होती. तिने आपल्याच भावाच्या लहान मुलीस डागण्या देऊन विद्रुप करुन तिला भीक मागण्यास भाग पाडले होते. तिला पोलिसांनी २८ जुलै २०१६ रोजी अटक केली होती. तिला जामीन मिळाला नसून, या महिलेला न्यायालयीन कामकाजासाठी मुख्यालयातील पोलिसांनी ९ जानेवारी २०१७ रोजी लातूरच्या न्यायालयात आणले होते. त्यावेळी पोलिसांच्या हाताला हिसका मारुन कविता शिंदे हिने न्यायालय परिसरातून पलायन केले. दरम्यान, ९ जानेवारीपासून कविताने आंध्र प्रदेशातील हैदराबाद शहरात बुरखा परिधान करुन पोलिसांना गुंगारा देत फरार होती. कर्नाटकातील बीदर, भालकी, बसवकल्याण, सोलापूर आणि पंढरपूर परिसरातही तिने या काळात वास्तव्य केल्याचे पुढे आले आहे. एका ठिकाणी एका रात्रीपेक्षा अधिक वेळ थांबायचे नाही, असे नियोजन कविताने केले होते. ती या काळात आपल्या ओळखीच्या लोकांचा, नातेवाईकांचा आधार घेत होती. दरम्यान, मोबाईल लोकेशनमुळे पोलिस आपला पाठलाग करीत आहेत, असे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने मोबाईल वापरणेही बंद केले होते. त्यामुळे पोलिसांना कविता नेमकी कुठे आहे, याचा सुगावा लावणे कठीण झाले होते. कविताच्या अटकेसाठी पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली. ती पंढरपुरात असल्याचे खबऱ्यामार्फत पोलिसांना कळाले. दरम्यान, कविता शिंदे ही एका ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी बसस्थानक परिसरात येणार होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंढरपूर शहरातील बसस्थानक परिसर गाठले आणि कविता शिंदेला अटक केली.
वेशांतर करून कविताने दिला होता पोलिसांना गुंगारा!
By admin | Published: February 05, 2017 11:17 PM