औरंगाबाद: दीड महिन्यापूर्वी वडीलांनी खरेदी केलेल्या भूखंडावर पत्रे ठोकून अतिक्रमण करणाऱ्या टोळक्याने विरोध होताच जागामालक आणि त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एका हल्लेखोराने अभियंता तरुणाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विजयनगर रस्त्यावर झाली. या घटनेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.
ऋषिकेश भास्कर मोरे (२३, रा. बाळकृष्ण नगर,गारखेडा परिसर )असे जखमीचे नाव आहे .याविषयी प्राप्त माहिती अशी की, जखमी ऋषिकेशचे वडिल भास्कर सखाराम मोरे यांनी दीड महिन्यापूर्वी विजयनगर रस्त्यावरील सखुबाई म्हस्के यांच्या मालकीची दहा बाय बारा लांबी रुंदी असलेली २२० चौरस फूट जागा खरेदी केली होती. या जागेवर मोरे कुटुंब दुकानाचा गाळा बांधत आहेत. आज सकाळी स्लॅबची लाकडे आणि प्लेटा काढण्याचे काम झाले आणि मिस्तरी भिंतीला प्लास्टर करीत होते.
दुपारी १:३० वाजेच्या सुमारास राहुल नरवडे हा दहा ते बारा तरुण आणि चार ते पाच महिलासह मोरे यांच्या भूखंडावर आला. सोबत त्यांनी एका वाहनातून लोखंडी पत्रे आणली होती. ही पत्रे बांधकामाच्या ठिकाणी लावून त्यांनी अतिक्रमण सुरू केले. बांधकाम मिस्त्रीने ही बाब ही फोन करून जागा मालक भास्कर मोरे, माजी नगरसेविका ज्योती मोरे , राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजाराम मोरे यांना सांगितले. मोरे बंधू आणि त्यांची मुले ऋषिकेश आणि महेश तेथे गेली. त्यांनी आमच्या भूखंडावर पत्रे काढा, तुम्ही कोण अशी विचारणा केली असता आरोपींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी एका आरोपीने ऋषिकेशवर चाकूहल्ला करून त्याला खाली पाडले. ऋषिकेश रक्ताच्या थारोळ्यात खाली पडताच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत ऋषिकेशला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे , फौजदार संतोष घोडके आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक लॅब पथकाला घटनास्थळी पाचारण केले.