औरंगाबाद : जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राखली जाणार असून, दर दिवशी सकाळी एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार, अशा २ हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाइन किंवा क्यूआर बेस तिकिटांची नोंदणी करता येईल. पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट नोंदणी करता येईल. पर्यटनस्थळांवर वेळेवर तिकीट मिळणार नाही, असा आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी बैठकीत दिला.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू करण्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पर्यटन उपसंचालक श्रीमंत हारकर, स.पो.आ. सुरेश वानखेडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, एमटीडीसी सहायक संचालक विजय जाधव, पुरातत्व विभागाचे डॉ. एम.के. चौले, मयुरेश खडके, ओजस बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, डीएचओ डॉ. सुधाकर शेळके, विभागीय नियंत्रक अरुण सिया, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन अध्यक्ष जसवंतसिंग, टुरिस्ट गाईड संघटनेचे सचिव उमेश जाधव उपस्थित होते.
बस फेऱ्या वाढविण्याचे आदेश
मास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी, तसेच पर्यटनस्थळी आरोग्य यंत्रणा व पोलीस विभागाने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून पर्यटकांना कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. वेरूळ, अजिंठा येथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे आदेश बैठकीत देण्यात आले.