लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद गोल्डतर्फे नुकताच तीन शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये नांदेडचे शहीद जवान संभाजी कदम यांची पत्नी शीतल कदम व कुटुंब, मांजरगाव येथील शहीद लान्स नायक कैलास वाघ यांची पत्नी रेखा वाघ व कुटुंब आणि भोकरदन येथील शहीद जवान रवींद्र सुरडकर यांची पत्नी आशा सुरडकर व कुटुंब यांचा समावेश होता.खिंवसरा एक्झिबिशन सेंटर येथे रविवारी (दि.४) पार पडलेल्या लायन्सच्या विभागीय परिषदेत घेण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याला ‘लायन्स गोल्ड’चे अध्यक्ष सीए विलास पाटणी, विभागीय प्रमुख प्रवीण काला, डॉ. रामेश्वर भारुका, एन. जी. कारखाने, आंतरराष्ट्रीय संचालक विनोद खन्ना, डॉ. नवल मालू, प्रांतपाल संदीप मालू, संजय व्होरा, नितीन बंग, एम. के. अग्रवाल, राजेश राऊत, महावीर पाटणी, तनसुख झांबड, सीताराम अग्रवाल, रवींद्र खिंवसरा, पंकज अग्रवाल, नितीन बगडिया, नीलेश मित्तल आदी उपस्थित होते. सीए विलास पाटणी यांच्यातर्फे तिन्ही शहीद कुटुंबियांमध्ये विभागून एक लाख रुपयांची आर्थिक मदतदेखील प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात शहीद सुरडकर यांचा सातवीत शिकणारा मुलगा आदित्यने सैनिकाच्या जीवनावरील कविता सादर केल्यानंतर उपस्थिताना अश्रू अनावर झाले. सर्वांनी उभे राहून साश्रू नयनांनी शहिदांना मानवंदना दिली. नीता राणा यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. राहुल दाशरथे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमासाठी किशोर ललवाणी, किशोर रावका, सतनामसिंग गुलाटी, मृगांक लेंभे, प्रसन्ना उगले, अमोल गोधा, सपना पाटणी, मनीषा काला, सीमा रावका, रचना दाशरथे, इशाल ललवाणी, जितेंद्र कक्कड, राहुल औसेकर आदींनी परिश्रम घेतले.
औरंगाबादेत लायन्स गोल्ड’तर्फे शहीद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:03 AM