विकास राऊत
औरंगाबाद : कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्याने मागील काही महिन्यांपासून विभागात ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. पुणे, रायगड, बुटीबोरी या तीन ठिकाणीच ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प असल्याने मराठवाड्यापर्यंत वाहतूकीत बराच वेळ जातो. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात पहिल्यांदाच औरंगाबाद आणि जालना येथे लिक्विड ऑक्सिजन उत्पादनाचे प्रकल्प होणार असून, त्यासाठी लवकरच सर्व परवानग्या देण्यासाठी निर्णय प्रक्रीया सुरू असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
१०० ते २०० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची निर्मिती या प्रकल्पांतून होईल, असेही सूत्रांनी सांगितले. प्रकल्प उभारणीसाठी औरंगाबाद आणि जालन्यातील काही ठिकाणच्या जागा पाहण्यात आल्या आहेत. तीन महिन्यात प्रकल्प होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद येथून संपूर्ण राज्य ४५० किमीच्या परिघात आहे. त्यामुळे प्रकल्पातून खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होईल. तसेच जालना येथून मराठवाड्यात सर्वत्र ऑक्सिजन देणे शक्य होईल. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत प्रकल्प उभारणाऱ्या काही उद्योजकांची चर्चा झाली आहे. त्यातील दोन उद्योजकांनी औरंगाबाद आणि जालन्याला पसंती दिली आहे. तातडीने सर्व परवानग्या मिळाव्यात, अशी अट उद्योजकांनी ठेवल्याने विभागीय प्रशासनाने पुूर्ण परवागनी मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे.
मराठवाड्यातील पहिले प्रकल्प- पुणे, रायगड, नागपूरनंतर मोठे ऑक्सिजन प्रकल्प मराठवाड्यात पहिल्यांदाच होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत.