- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खरेदीचे विविध प्रकार समोर येत आहेत. १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीत ग्रंथालय विभागाने ४० लाख रुपयांपर्यंतची ई-बुक, ई-जर्नल्स खरेदी करण्याचा प्रस्ताव ऐनवेळी सादर केला. त्यास खरेदी समितीने मंजुरी दिली. मात्र, प्रत्यक्षात खरेदीसाठी ३ कोटी रुपयांच्या ई-बुकची यादी सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विद्यापीठाच्या खरेदी समितीची बैठक बुधवारी (दि.५) झाली. या बैठकीत १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीतील ई-बुक, ई-जर्नल्स खरेदीचा प्रस्ताव पुन्हा ठेवण्यात आला होता. १९ नोव्हेंबर रोजी खरेदी समितीचे सदस्य संजय निंबाळकर आणि किशोर शितोळे यांनी ग्रंथालय विभागाच्या ऐनवेळीच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली होती. यानुसार ग्रंथालयासाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदी ४० लाख रुपयांपर्यंत ई-बुक, ई-जर्नल्स खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, एकाच वेळी सगळी खरेदी करण्याऐवजी विभाग, प्राध्यापक आणि संशोधकांच्या मागणीनुसार खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्यक्षात खरेदी करण्यासाठी ग्रंथालय विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव दिला असता, त्यात ३ कोटी रुपयांची ई-बुक, ई-जर्नल्सची यादी देण्यात आली. या यादीला कुलगुरूंच्या विशेष अधिकारात मान्यता घेतल्याचे पत्रही जोडण्यात आले.
खरेदी समितीत ४० लाख रुपयांपर्यंतचा मंजूर झालेल्या प्रस्तावात बदल करून ३ कोटी रुपयांपर्यंत वाढविला असल्याची माहिती किशोर शितोळे, संजय निंबाळकर यांना झाली. तेव्हा दोघांनीही ३ कोटी रुपयांच्या ई-बुक, ई-जर्नल्सच्या खरेदीला विरोध दर्शविला. यामुळे लेखा विभागाने खरेदीला मान्यताच दिली नाही. या घडामोडीनंतर बुधवारी (दि.५) खरेदी समितीची बैठक झाली. या बैठकीत ३ कोटी रुपयांच्या ई-बुक, ई-जर्नल्सच्या खरेदीला संजय निंबाळकर यांनी विरोध केला. किशोर शितोळे हे बैठकीला अनुपस्थित होते, तरीही त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करू नये, अशा सूचना प्रशासनाला केल्या होत्या.
वापरकर्त्यांची आकडेवारीच नाही; विभागांचीही माहिती नाही‘नॅक’ मूल्यांकनाच्या धर्तीवर ग्रंथालयात ई-बुक, ई-जर्नल्सची कमतरता असल्यामुळे हा खरेदीचा घाट घालण्यात आला होता. मात्र, यापूर्वीच विद्यापीठाने ५ हजारांपेक्षा अधिक ई-बुक, ई-जर्नल्सची खरेदी केलेली आहे. ही सुविधा किती विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक घेतात. त्याचा उपयोग करतात, याची आकडेवारी ग्रंथालय विभागाकडे नसल्याचे पाहणी आढळून आले, तसेच कोणत्या विभागातील संशोधकांसाठी ही जर्नल्स, ई-बुक हवी आहेत, याचीही ठोस आकडेवारी ग्रंथालय विभागाकडून देण्यात आली नाही. यामुळे या खरेदीत मोठे गौडबंगाल असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खरेदी गरजेची विद्यापीठातील ग्रंथालय ई-बुक, ई-जर्नल्सच्या बाबतीत इतर विद्यापीठांच्या तुलनेत मागे आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने ई-बुक, ई-जर्नल्सच्या उपलब्ध करून दिलेल्या सुविधा नुकत्याच बंद केल्या आहेत. याचा मोठा फटका बसला असल्यामुळे ई-बुक, ई-जर्नल्स खरेदी करावी लागणार आहे.-डॉ. धर्मराज वीर, ग्रंथपाल