औरंगाबाद : शहरात सध्या सर्दी, खोकला, तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कोणी वातावरणाचा बदल म्हणत आहे, तर कोणी नेहमीचा सर्दी, खोकला म्हणून दुखणे अंगावर काढत आहे. पण ३ ते ५ दिवसांपेक्षा अधिक दिवस सर्दी, खोकला, ताप असेल तर तो कोरोना संसर्ग ( corona virus in aurangabad ) असू शकतो, त्यामुळे कोरोना टेस्ट करून घेतली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेकांना सर्दी, खोकल्याने विळखा घातला आहे. खासगी रुग्णालयातील ओपीडीत सध्या हेच रुग्ण सर्वाधिक आहे. अगदी मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वच सर्दी, खोकल्याने हैराण आहेत. काहीही त्रास नसताना अचानक शिंका येत असल्याचाही अनुभव नागरिकांना येत आहे. वातावरणातील बदल म्हणून अनेक जण स्वत:हून औषधी घेत आहेत, परंतु असे करणे आजार वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते.
निगेटिव्ह तरच नेहमीचे दुखणेसर्दी, खोकला, तापेचे रुग्ण वाढले आहेत. या रुग्णांनी कोरोना संशयित म्हणून स्वत:ला आयसोलेट केले पाहिजे. कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्यानंतरच नेहमीची सर्दी म्हणावे. परदेशवारी करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही तपासणी करून घेतली पाहिजे.- डाॅ. आनंद निकाळजे, अतिदक्षता तज्ज्ञ
ज्येष्ठांची काळजी घ्यावीकोरोना हा फ्लू व्हायरस आहे. सर्दी, खोकला, ताप असणाऱ्यांनी कोरोना तपासणी केली पाहिजे. घरात ज्येष्ठ असेल तर किमान त्यांच्यासाठी ही तपासणी करून घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.- डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी
स्वत:हून औषधी घेऊ नकानेहमीचे दुखणे म्हणून आजार अंगावर काढता कामा नये. शिवाय स्वत:हून कोणतीही औषधी घेता कामा नये. त्यातून त्रास आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओपीडीत येणाऱ्या रुग्णांत काही लक्षणे जाणवली तर कोरोना तपासणीचा सल्ला दिला जातो.- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ
सकारात्मकतेने सामोरे जावेवातावरणातील बदलामुळे विषाणूचे आजार वाढतात. साधारण सर्दी, खोकला हा ३ ते ५ दिवसांत बरा होतो. त्यापेक्षा अधिक दिवस सर्दी, खोकला, ताप असेल तर मात्र कोरोनाची चाचणी करून घेतली पाहिजे. कोरोना झाला तरी ‘मी बरा होईल’ अशा सकारात्मकतेने त्याला सामोरे गेले पाहिजे.- डाॅ. गजानन सुरवाडे, सिनिअर फिजिशियन