वाळूज महानगर : कोरोना संकटामुळे यंदाही छोट्या पंढरपुरातील आषाढी एकादशी यात्रा दिंड्या, पालखी, वारकरी व भाविकांअभावी सुनीसुनी होती. भक्तांनी मंगळवारी (दि. २०) मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरून दर्शन घेत कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी श्रीविठ्ठलाला साकडे घातले.
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज उद्योगनगरीतील छोट्या पंढरपुरात दरवर्षी आषाढी एकादशी यात्रेला मोठी गर्दी होत असते. कोरोना संकटामुळे गतवर्षीपासून आषाढी यात्रा रद्द करण्यात येत आहे. यंदाही श्री विठ्ठल - रुख्मिणी संस्थानच्या वतीने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत महाभिषेक, पूजा व आरती करण्यात आली. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विजय सक्करवार व त्यांच्या सुविद्य पत्नी शीतल सक्करवार यांच्या हस्ते सोमवारी मध्यरात्री १२ वाजता महाभिषेक व पूजा करून चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव ह.भ.प. भिकाजी महाराज खोतकर, माजी अध्यक्ष रत्नाकर शिंदे, पांडुरंग कुलकर्णी, अप्पासाहेब झळके, बंकटलाल जैस्वाल, हरिश साबळे, कृष्णा झळके, गणेश नवले, वळदगावचे सरपंच अमर डांगर, उपसरपंच संजय झळके, पंढरपूरचे माजी सरपंच शेख अख्तर, महेंद्र खोतकर, संतोष चोरडिया, हरिभाऊ शेळके, विष्णू जाधव, शिवाजी गायकवाड आदींची उपस्थिती होती. पूजा झाल्यानंतर मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. पहाटे ५ वाजता उद्योजक दत्तात्रय डवले व त्यांच्या अर्धांगिनी शीतल डवले यांच्या हस्ते महापाद्यपूजा व आरती करण्यात आली.
विठूमाउलीला साकडे
श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून भाविक येत होते. मात्र मंदिराचे प्रवेशद्वार बंद केल्याने शेकडो भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले. परिसरातील वारकरी व भाविक मंगळवारी सकाळपासून विठ्ठलनामाचा जयघोष करीत छोट्या पंढरपुरात दाखल होत होते. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, यासाठी मनोभावे प्रार्थना करीत साकडे घालत होते.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
छोट्या पंढरपुरात आषाढी यात्रेला गर्दी उसळते. त्यामुळे मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारनंतर प्रवेशद्वारासमोर दर्शनासाठी गर्दी होत असल्याचे लक्षात येताच सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाविकांनी घरातूनच दर्शन घेण्याचा सल्ला देत माघारी पाठविले. दुपारी पावसाचे आगमन झाल्याने भाविकांची गर्दीही ओसरली होती. सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोलीस तसेच संस्थानचे पदाधिकारी रोखताना दिसून आले.
फोटो ओळ- छोट्या पंढरपुरातील श्रीविठ्ठल-रुख्मिणी मंदिरात महाभिषेकानंतर महापूजा व आरती करताना विजय सक्करवार, शीतल सक्करवार, संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार आदी.
-------
फोटो ओळ- कोरोनाच्या संकटामुळे छोट्या पंढरपुरात आषाढी यात्रा भाविकांअभावी अशी सुनीसुनी दिसून आली.
------------------------