बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसामध्ये तब्बल दीड महिन्याचा खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील कपाशी पीक कोमेजले होते. मात्र, मागील चोवीस तासांत सर्वदूर झालेल्या पावसामुळे सुमारे दोन लाख ७८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान मिळाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशी लागवडीला प्राधान्य देतात. यंदा खरिपात दोन लाख ९७ हजार ९९२ हेक्टरवर कपाशी लागवडीचे नियोजित होते. जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकºयांनी सुरुवातीलाच कपाशीची लागवड केली. मात्र, भोकरदन व जाफराबाद तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी शेतकºयांना कपाशीची दुसºयांदा लागवड करावी लागली. जुलैपर्यंत जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार ८७ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. सध्या कपाशी पीक फुले येण्याच्या अवस्थेत आहे. शेतकºयांनी आतापर्यंत खते, औषधी फवारणीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, मूग, उडीद हे पिके वाया गेली.कपाशी पिकाची वाढही खुंटली होती. पाणी उपलब्ध असणाºया शेतकºयांची ठिबक सिंचनच्या मदतीने कपाशी पीक जगविण्यासाठी धडपड सुरू होती. तर कोरडवाहू जमीन असणाºया शेतकºयांनी कपाशी पीक येण्याची आशा सोडली होती. त्यामुळे कापसाचे उत्पादन पन्नास टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. दरम्यान, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे कोमेजू लागलेली कपाशीची झाडे टवटवीत झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे कपाशीसह अन्य तात्पुरता दिलासा मिळाला.
पावणेतीन लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:56 AM