औरंगाबाद : ‘हर दिल से नफरत मिटाना है, बुद्ध को हर सांस में बसाना है’, असा निर्धार करून मी गेल्या तीस वर्षांपासून पर्यावरण चळवळीत कार्यरत आहे. ‘बोधीवृक्ष आपल्या दारी’ अभियानांतर्गत २००० सालापासून आम्ही सुमारे ५० हजार बोधिवृक्षांचे मोफत वाटप केले आहे, असे या अभियानाचे प्रमुख प्रा. राजेश भोसले पाटील यांनी सांगितले.
२००० साली अफगाणिस्थानात लादेनने बुद्ध मूर्तीची विटंबना केली. रॉकेट लाँचरने बुद्ध मूर्ती तोडल्या. त्याचा निषेध म्हणून राजेश पाटील यांनी टीव्ही सेंटर चौकात लादेनचा पुतळा जाळला व टीव्ही सेंटर बंदची हाक दिली. रस्त्यावर जाळपोळ केली म्हणून पाटील यांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली. सुटकेनंतर, पाटील यांनी एकच ध्यास घेतला की, ज्या तथागतांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला, त्यांच्यासाठी एकच संकल्प सोडला की ‘हर दिल से नफरत मिटाना है, बुद्ध को हर सांस में बसाना है.’या प्रसंगानंतरच्या पहिल्या पौर्णिमेपासून बोधीवृक्ष लावण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ५० हजार बोधिवृक्षांचे वाटप करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीपासून ते १८ एप्रिल तथागत बुद्धांच्या जयंतीपर्यंत सकाळी १० ते ४ या वेळेत प्रा. राजेश पाटील हे भारतीय वंशांच्या झाडांचे मोफत वाटप करीत आहेत. ज्यांना बोधीवृक्ष, वड, कडुलिंब व उंबर, अशी झाडे लागवडीसाठी हवी आहेत, त्यांनी ओळखपत्राच्या पुराव्यानिशी डिफेन्स करिअर ज्युनिअर कॉलेजचे कार्यालय, एन-१२, स्वामी विवेकानंद गार्डनसमोर, हडको येथून मोफत घेऊन जावीत. उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे वृक्षप्रेमींनी रोपे घरी नेऊन दि.७ जून किंवा चांगला पाऊस पडेपर्यंत जतन करावीत व योग्यवेळी खड्डा करून त्याचे किमान ३ ते ४ वर्षे संरक्षण करावे, असे आवाहन यासंदर्भात करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी नेहरू युवा केंद्र, इंडियन डिफेन्स अकॅडमी, निर्भया डिफेन्स अकॅडमी, डिफेन्स करिअर ज्युनिअर कॉलेज व बोधीवृक्ष आपल्या दारी- राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण व संवर्धन महाकृती अभियान कार्यरत आहेत.
बोधीवृक्ष ध्यानधारणेसाठी उपयुक्तऔरंगाबाद शहराच्या दुतर्फा, लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा तसेच वेरूळ, अजिंठा, पितळखोरा, चैत्यभूमी, दीक्षाभूमीच्या दुतर्फा बोधीवृक्ष लावण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला आहे. हजारो प्रकारचे वृक्ष असताना सिद्धार्थ गौतम पिंपळाखालीच का बसले, यामागे विज्ञान आहे, हे समजून घेतले पाहिजे. बोधीवृक्ष २४ तास आॅक्सिजन देतो, बोधीवृक्ष ध्यानधारणेसाठी उपयुक्त आहे. हृदयरोगावरही बोधीवृक्ष उपयुक्त आहे. बोधीवृक्ष रक्त शुद्धिकारक, बुद्धिवर्धक, शक्तिवर्धक, रोगनाशक आहे. ‘बुद्ध हवा, तर बोधीवृक्ष लावा’ असे आवाहन या अभियानातर्फे करण्यात आले आहे.
एक तरी बोधीवृक्ष लावा... औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर राज्यांमध्येसुद्धा बोधीवृक्ष वाटप करण्यात आले. बुके, फुले, हाराऐवजी बोधीवृक्ष, असा संदेशही देण्यात आला. प्रत्येकाच्या घराजवळ किंवा जागा उपलब्ध असेल त्याठिकाणी प्रत्येकाने किमान एक तरी बोधीवृक्ष लावावा व तो जगवावा हा यामागचा उद्देश.बोधीवृक्ष फक्त एक झाड नाही, तर बोधीवृक्ष जीवन आहे, एक क्रांती आहे, एक चैतन्य आहे. जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बोधीवृक्ष आहे, अशी मांडणी राजेश भोसले पाटील करतात.