कायगाव (औरंगाबाद ) : गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू असलेल्या भारनियमन विरुद्ध सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश आले आहे. आता १५ मार्च पर्यंत या भागातील वीजपुरवठा दररोज ६ तास सुरू राहणार आहे. याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता एस.डी. वैद्य यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन स्पष्ट केले आहे.
मागील आठ दिवसांपासून गोदावरी नदीच्या काठावरील गंगापूर आणि पैठण तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना दिवसातून फक्त चार तास वीजपुरवठा सूरु होता. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन सुरू केले होते. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यानाही याबाबत निवेदन देऊन त्वरित वीस तासांचे भारनियमन बंद करून वीजपुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली होती. नसता उद्योगांना होणारा जायकवाडीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर विभागीय आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी आणि लाभक्षेत्र प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांत याबाबत चर्चा झाली. त्यानुसार १५ मार्चपर्यंत या भागात वीजपुरवठा ६ तास सुरू ठेवण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आदेशीत करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान प्रशासनाने सहा तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी स्वागत केले आहे. मात्र सहा तास वीजपुरवठा होऊनही शेतकऱ्यांना सिंचनाची समस्या कायम राहील त्यामुळे वीजपुरवठा किमान आठ तास सुरू रहावा यासाठी आंदोलन सुरूच राहील असे सांगितले.