वाळूज महानगर : शहरातून वाळूज एमआयडीसीत कामासाठी येणाऱ्या दुचाकीस्वार सुरक्षारक्षकास भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ए. एस. क्लबजवळ घडली. सुरेश योगानंद झा (३२ रा. मोंढा नाका, औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सुरेश झा हे वाळूज एमआयडीसीतील ऋचा कंपनीत सुरक्षारक्षक होते. कंपनीत जाण्यासाठी ते दुचाकीने (एमएच २० डीएक्स ३१९५) जात होते. भरधाव कंटेनर (डब्यूबी ११ डी ८६१४)ने ए. एस. क्लबजवळ अचानक लिंकरोडकडे वळण घेतले. त्यामुळे दुचाकी कंटेनरच्या चाकाखाली सापडून स्वार चिरडला गेला. चौकात तैनात वाहतूक शाखेचे पोहेकॉ राहुल साळवे यांनी वाहनधारकांच्या मदतीने सुरेश झा यांना ट्रकच्या चाकाखालून बाहेर काढले. एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मोबाईलवरून ओळख पटली या अपघातात मृत सुरेश यांच्या हेल्मेटचाही चुराडा झाला असून दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर झा यांच्या मोबाईलवरून पोलिसांनी त्यांचा चुलत भाऊ अवधेश झा (रा. कमळापूर) यांच्याशी संपर्क साधल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार यांनी सांगितले. फरार कंटेनर चालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे पुढील तपास करीत आहेत.