फुलंब्री : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनामध्ये कर्जमाफीस पात्र असूनही आमचे कर्ज माफ झाले नाही, असा सवाल करीत तालुक्यातील पिरबावडा येथील सात शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे . मागील चार वर्षापासून सतत सरकारी कार्यालयाच्या खेटा मारत असूनही का कर्जमाफी झाली नाही अशी विचारणा या शेतकऱ्यांनी केली आहे.
फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा येथील शेतकरी दिनकर विश्वनाथ काळे ,दत्तू नामदेव काळे, कारभारी कडूबा काळे, प्रकाश मोहनाजी बकाल, उत्तम विश्वनाथ काळे, ठगनाबाई तातेराव बोकील, नवनाथ कोंडीबा मीसाळ यांनी २०१९ मध्ये महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजना मध्ये कर्ज माफी व्हावी म्हणून अर्ज दाखल केला होता.
१४ ऑक्टोबर २०२० ला सहायक निबंधक यांनी पत्र पाठवून तुमचे कर्ज माफ झालेले आहे, याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये आपले नाव येईल असे कळविले होते. मात्र, शेतकऱ्यांची कर्जमाफी काही झाली नाही. तेव्हापासून सदर शेतकरी तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाच्या खेटा मारत आहेत. पण त्यांना कोठूनही मदत मिळाली नाही. दरम्यान, ३ नोव्हेंबरला सातही शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री धनंजय मुंढे यांना पत्र पाठवून आम्ही कर्ज माफीत पात्र ठरवून ही आमचे कर्ज का माफ झाले नाही अशी विचारणा केली. तसेच याची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे.
१३ ऑगस्ट २०१८ मध्ये शेतीकरीता ९५ हजार रुपये पिक कर्ज घेतले होते. २०१९ च्या कर्जमाफीमध्ये पात्र ठरलो असे पत्र देखील मला मिळाले. पण कर्ज माफ झालेले नाही. या करिता सतत शासन दरबारी चकरा मारत आहे. पण अजूनतरी मदत मिळाली नाही. आज रोजी माझ्याकडे १ लाख ३४ हजार रुपये असल्याचे दाखविण्यात आले व चार महिन्यापूर्वी बँकेने माझे खाते गोठवले आहे, अशी माहिती शेतकरी कारभारी कडूबा मिसाळ यांनी दिली