औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. १५ ऑगस्टपासून मतदानाच्या दिवसापर्यंत महायुती आणि महाआघाडीचे मतदार अज्ञातस्थळी रवाना होणार आहेत. महायुतीचे अज्ञातस्थळ इगतपुरी असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून बाहेर आली आहे.
इगतपुरीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीचे सुमारे ३३० हून अधिक मतदार पाच दिवस यथेच्छ आनंद लुटतील. त्यानंतर त्यांना फे्रश मूडमध्ये औरंगाबादला आणले जाईल. तेथून आल्यावर मतदारांना थेट गटनिहाय मतदान केंद्रांवर नेले जाईल. त्यांचे मतदान करून घेतल्यानंतर त्यांची राजकीय नजरकैदेतून सुटका होईल. १५ ऑगस्टपासून १८ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत हे सर्व मतदार पक्षातील वरिष्ठांच्या देखरेखीत असतील. त्यांना इतर राजकीय पक्षांतील लोकांशी बोलता येणार नाही. तसेच त्यांचा संपर्कदेखील होणार नाही. तहसीलनिहाय मतदान होणार असल्यामुळे प्रत्येक केंद्रनिहाय मतदारांचे गट करण्यात आले आहेत. १७ मतदान केंद्रांवर जाणाऱ्या मतदारांना एकत्रितपणे नेण्याऐवजी त्यांची वेगवेगळी व्यवस्था केली जाणार आहे.
महायुतीकडून अंबादास दानवे तर महाआघाडीकडून भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी हे उमेदवार आहेत. एक अपक्ष उमेदवारही मैदानात आहे. पहिल्या पसंतीचे बहुमत सध्या महायुतीच्या बाजूने दिसते आहे. फोडाफोडी आणि घोडेबाजाराचे राजकारण सध्या तरी चर्चेत नाही. भाजपला शांत करण्याचा प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे आणि कुलकर्णी यांच्यात कोण बाजी मारील याचा निकाल २२ आॅगस्ट रोजी हाती येणार आहे. दरम्यान शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, महायुतीने पूर्ण तयारी केली असून, विजयाच्या दिशेने आम्ही जाऊ. १८ आॅगस्टपर्यंत मतदारांसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर महाआघाडीचे उमेदवार कुलकर्णी म्हणाले, आमचे मतदार सोबतच आहेत. आमचीही तयारी पूर्ण झाली आहे.
राजकीय समीकरण महायुती ३३०महाआघाडी २५०एमआयएम-अपक्ष ०७७एकूण ६५७
अंदाजे पक्षीय बलाबल पक्ष मतदार भाजप १८९शिवसेना १४१ काँग्रेस १७०राष्ट्रवादी काँग्रेस ०८०एमआयएम ०२८रिपाइं, बसपा, अपक्ष ०४९एकूण ६५७