औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी सोमवारी एकत्र येत मतदान केले. पक्षातील दोन नगरसेवकांच्या शब्दावर विश्वास ठेवत सर्वांनी मतदान केले. मतदान संपताच नगरसेवकांमध्ये ‘वाद’ विकोपाला गेला आहे. रात्री २ वाजेपर्यंत गुप्त बैठकही घेण्यात आली. बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. निवडणुकीचा हा ‘वाद’ हैदराबादपर्यंत नेण्याचा इशाराही काही नगरसेवकांनी दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
( स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदारांचा शेवटचा दिवस झाला ‘गोड’ )
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची चातकासारखी नगरसेवक वाट पाहत होते. अखेर सोमवारी तो दिवस उगवला. निवडणूक रिंगणात यंदा मातब्बर उमेदवार नसल्याने नगरसेवक कमालीचे नाराज झाले होते. शेवटच्या क्षणाला शिवसेनेने ‘एमआयएम’ पक्षाशी संपर्क साधला. सेना नेत्यांसोबत पक्षातील दोन नगरसेवकांनी चर्चा केली. त्यानंतर एमआयएम पक्षातील सर्व नगरसेवकांना चर्चा ‘यशस्वी’ झाल्याचे सांगण्यात आले. दोन नगरसेवकांच्या शब्दावर विश्वास ठेवत मोठ्या उत्साहात नगरसेवकांनी सोमवारी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात जाऊन मतदानही केले. मतदान संपताच पक्षातील नगरसेवक चलबिचल होऊ लागले. त्यांनी जबाबदार सहकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने नगरसेवकांच्या पायाखालची वाळूच घसरली. संतप्त नगरसेवकांनी रात्री उशिरा आपल्या दोन सहकाऱ्यांना शोधून तातडीच्या बैठकीचे आयोजन केले. एका गुप्त ठिकाणी रात्री २ वाजेपर्यंत बैठकही सुरू होती. बैठकीत सर्व नगरसेवकांची ‘समाधानकारक’ तोडगा काढावा, अशी मागणी होती. उशिरापर्यंत बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. मंगळवारी दिवसभर एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांची धावपळ सुरू होती. लवकरच या प्रकरणात मार्ग न निघाल्यास पक्षाच्या हैदराबाद येथील नेत्यांपर्यंत विषय नेण्याचा इशाराही काही नगरसेवकांनी दिला. त्यामुळे पक्षातील जबाबदार नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
डबल गेम झाल्याची चर्चाएमआयएम पक्षाच्या काही नगरसेवकांनी सेना नेत्यांसोबत चर्चा केली. याच नगरसेवकांनी काँग्रेस उमेदवारासोबतही चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या डबल गेमप्रकरणी पक्षात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.