औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सोमवारी मतदान घेण्यात आले. औरंगाबाद महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमचा कल शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराकडे दिसून आला. गोपनीय पद्धतीने झालेल्या या मतदानात एमआयएमच्या सर्व २४ नगरसेवकांनी युतीलाच मतदान केल्याचे बोलले जात आहे. यावर २२ ऑगस्ट रोजी अंतिम शिक्कामोर्तब होईल.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात दोनच प्रमुख उमेदवार होते. शिवसेना-भाजप युतीचे अंबादास दानवे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बाबूराव कुलकर्णी. या निवडणुकीत कुलकर्णी निवडणूक लढवत असल्याचे चित्र कुठेच दिसून आले नाही. त्यामुळे दानवे यांनी शेवटच्या क्षणी एमआयएम, अपक्षांना आपल्याकडे ओढण्यासाठी कसरत सुरू केली. कुलकर्णी अजिबात लक्ष देत नसल्याने एमआयएमसह इतर काही नगरसेवकांचा नाईलाज झाला. मागील साडेचार वर्षांपासून चातकासारखी या निवडणुकीची नगरसेवक वाट पाहत होते. नगरसेवकांच्या अपेक्षांचा डोंगर बराच मोठा होता. कारण मागील निवडणुकांमध्ये मतदार चांगलाच ‘भाव’खात आले आहेत. या निवडणुकीत अपेक्षांचा बाजार चांगलाच मंदावला होता. शेवटच्या क्षणाला एमआयएम, अपक्ष, राष्टÑवादीने मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३ वा. एमआयएमने एकत्र येत मतदान केले. ही सर्व मते शिवसेनेच्या पारड्यात जाणार असल्याचे बोलले जात आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी असून, याच दिवशी कोणाचे मत कुठे गेले यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
कारागृहातून मतीनही आले...एमआयएम पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आणि सध्या हर्सूल कारागृहात असलेले नगरसेवक सय्यद मतीनही मतदानासाठी आज तहसील कार्यालयात आले होते. त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतीन यांचे वडील, नातेवाईक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहतमहापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य आहेत. अलीकडेच एका सदस्याने वंचितमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित चार जणांनीही मतदान केले. सेना नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ३.४५ वाजता मतदान केले.
काँग्रेसमध्येही फाटाफूटकाँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना साधे फोनही केले नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक असंतोषाची भावना खदखदत होती. हा असंतोष सेनेला फायदेशीर ठरल्याची चर्चा आज दिवसभर होती.
शिवसेनेचा दावा ५३०शिवसेनेने या निवडणुकीत चांगलीच ‘फिल्डिंग’लावली होती. नियोजित व्यूहरचनेनुसार सेनेने आपले मतदान अगोदर करून घेतले. त्यानंतर शेवटच्या क्षणी जेवढे गळाला लागतील तेवढे मतदान आपल्या बाजूने करून घेतले. ६४७ पैकी किमान ५३० मते पडतील, असा दावाही सेना नेत्यांनी केला आहे.