औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मतदानाचा दिवस मतदारांसाठी गोड ठरला. मागील अठरा दिवसांपासून काहीही हाती न लागलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी हाती फूल नाहीतर फुलाची ‘पाकळी’ पडली. निवडणुकीसाठी ९८.४८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. ६५७ पैकी ६४७ मतदारांनी मतदान केले. १० मतदार गैरहजर राहिले. त्यामध्ये जालन्यामधील ७ आणि औरंगाबाद, सिल्लोड व पैठण येथील प्रत्येकी १ मतदारांचा समावेश आहे. ३२१ पुरुष आणि ३२६ महिला मतदारांनी निवडणुकीत मतदान केले.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यात थेट आमने-सामने लढत झाल्याचे स्पष्ट आहे. बहुमतामुळे महायुतीचे पारडे जड होते. तरीही इतर पक्षातील मतदान फोडण्यासाठी युतीने प्रचंड मेहनत घेतली. कारण भाजपवर शिवसेनेला मतदान होईपर्यंत भरवसा नव्हता. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणामुळे भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या सर्व नेत्यांच्या मध्यस्थीने भाजपचा भरवसा जिंकण्यात शिवसेनेला यश आले. त्याचे परिणाम सोमवारी झालेल्या मतदानावर दिसून आले. आघाडीची काही मते फुटतील, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला.
महापौरांनी केले पहिले मतदानऔरंगाबाद जिल्ह्यातील पहिले मतदान महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र होते. त्यानंतर माजी महापौर विकास जैन, त्र्यंबक तुपे यांनी मतदान केले. नगरसेवक सिद्धांत शिरसाट हे रुग्णालयातून मतदानासाठी आले. तीन मतदारांना मदतनीस देण्यात आले. यामध्ये मोहन मेघावाले, बन्सी जाधव व अन्य एकाचा समावेश होता. जि. प. गट सदस्याच्या ओळखपत्रावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानासाठी थांबविण्यात आले. स्वाक्षरी आणल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद तहसीलमध्ये सर्वाधिक १३८ मतदान होते. तेथे १०० टक्के मतदान झाले.
९ महिला मतदारांनी केले नाही मतदाननिवडणुकीत ९ महिला मतदारांनी मतदान केले नाही. ६५७ मतदारांपैकी ३३५ महिला मतदार आहेत. ३२२ पुरुष मतदारांपैकी ३२१ मतदारांनी मतदान केले. तर ३२६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.