औरंगाबाद : लॉकडाऊनची शहरात कडक अंमलबजावणी सुरू असताना विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत असल्याचे आपण पाहातच आहोत. मात्र, पोलिसांनी पोलिसांवर कारवाई केल्याचे पाहिलेले नाही; पण हो सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमध्ये वाहनांवरून विनाकारण फिरणाऱ्या तीन पोलिसांवरच कारवाई झाल्याचे रविवारी पाहावयास मिळाले.
ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दंड आकारला आहे. ही कारवाई रविवारी (दि.१२) दुपारी साडेबाराच्या सुमारास टीव्ही सेंटर परिसरात करण्यात आली. शहरात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने १० ते १८ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले. गेल्या दोन दिवसांपासून शहर पोलीस प्रशासन लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे. सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि त्यांचे पथक हे गेल्या दोन दिवसांपासून सिडको परिसरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोन दिवसांपासून टीव्ही सेंटर, जाधववाडी चौक परिसरात काही ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारीे फिरताना दिसून येत होते. अशोक गिरी हे टीव्ही सेंटर परिसरात गस्त घालत असताना एक जण दुचाकी चालवीत असताना मोबाईलवर बोलताना दिसला. त्याला अडवून गिरी यांनी विचारपूस केली तेव्हा त्याने आपण ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगितले
पोलीस कर्मचारी असताना दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलतो. त्यामुळे गिरी यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला दंड आकारला. त्यानंतर पुन्हा एका दुचाकीवर दोन पोलीस कर्मचारी बसून जाताना दिसले. त्यांना अडविल्यावर त्यांनीही ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगितले. त्या दोघांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांना एक न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा असा दुजाभाव नको, या भावनेतून गिरी यांनी या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली.
१८४४ वाहनधारकांंवर गुन्हे दाखललॉकडाऊन असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर तीन दिवसांत शहरी भागात १८४४ वाहनधारकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.शहर विभाग- ७३, सिडको विभाग-६९, छावणी विभाग-१७, वाळूज विभाग-३१, असे एकूण १९० गुन्हे दाखल असून, रविवारी सायंकाळपर्यंत कलम १८८ प्रमाणे औरंगाबाद शहरात २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ८१,५०० रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.