औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊनचे सुधारित आदेश लागू करण्यात आले आहेत. आत्ता 31 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू असेल. यामुळे ३० मार्च रोजी सर्व व्यवहार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतील. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सकाळी आठ ते बारा या वेळेत सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांना पेट्रोल उपलब्ध राहणार आहे. तसेच हॉटेल्स सुद्धा रात्री आठ वाजेपर्यंत केवळ होम डिलिव्हरी देऊ शकतील असे सुधारित आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी प्रशासनाने याबाबत आदेश काढले होते.त्यानुसार जिल्ह्यात जिल्ह्यात 30 मार्च ते आठ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू असणार होता. मात्र, आता या आदेशात प्रशासनाने सुधारणा केली असून नवीन आदेशानुसार 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सुधारित आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सकाळी आठ ते बारा वाजेदरम्यान इंधन उपलब्ध असणार आहे. 12 वाजेनंतर पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचारी यांनाच ओळपत्र दाखवून इंधन मिळणार आहे. नव्या आदेशात आणखी एक सुधारणा करण्यात आली असून शहरात होम आयसोलेशनची संख्या मोठी असल्याने हॉटेल्सला रात्री आठ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची सूट देण्यात आली आहे.
यासोबतच पूर्वनियोजित परीक्षांसाठी हॉल तिकीट दाखवून विद्यार्थ्यांना प्रवेशाची सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पूर्वीच्या आदेशातील प्रतिबंधित आणि सूट देण्यात आलेल्या बाबी तशाच लागू असणार आहेत.