औरंगाबाद : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र स्वत:च्या जिवाची तमा न बाळगता आपले कर्तव्य निभावले. पहिल्यांदाच रस्त्यांवर उतरून पोलिसांच्या मदतीने ‘लॉकडाऊन’ यशस्वी केले. महापालिकेची वॉररूम २४ तास खुलेच आहे.
मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सूक्ष्म नियोजनामुळेच हे शक्य झाले. ‘लॉकडाऊन’ यशस्वीतेसाठी तसेच कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी खास ‘कंट्रोल रूम’ची त्यांनी निर्मिती केली. मुख्य नियंत्रकांबरोबरच दोन पथकप्रमुखांनी २४ तास लक्ष ठेवून परिस्थिती हाताळली.कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा, पोलीस, महसूल प्रशासनाने ‘मायक्रो प्लॅनिंग’ केली. पाण्डेय यांनी लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वीतेसाठी ‘कंट्रोल रूम’ची स्थापना केली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यावर मुख्य नियंत्रकांची जबाबदारी सोपवून कंट्रोल रूममध्ये १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरून कर्तव्यावरील चारशे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंकुश लाडके यांच्यावर सुपरवायझरची जबाबदारी दिली.
कंट्रोल रूममध्ये १८ कर्मचारीशहरभर कर्तव्य बजावत असलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा आढावा आणि परिस्थितीचे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘कंट्रोल रूम’मध्ये १८ कर्मचारी कार्यरत होते. दिवस-रात्र या कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे आपले कर्तव्य बजावले. 10 जुलैपासून आतापर्यंत या कंट्रोल रूमला एकदाही कुलूप लागले नाही. फिल्डवर असलेल्या कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या, कर्मचारी काय करतात, याचा आढावा फोन तसेच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून वॉररूममधील कर्मचाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. अनेकदा स्पॉटवर जाऊन तपासणी केली. तर रस्त्यावर नियुक्त पथकाने जिथे पोलीस उपलब्ध नव्हते, तिथे पॉइंट लावून पोलिसांची सुद्धा भूमिका निभावली.
मनपा कर्मचाऱ्यांचा अभिमान लॉकडाऊनच्या काळामध्ये पहिल्यांदाच मनपाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. अत्यंत नियोजन पद्धतीने सर्वच कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दिवस असो वा रात्र याची तमा न बाळगता परिस्थिती नियंत्रणासाठी हातभार लावला. विना तक्रार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक तसेच अभिमानही आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक, महापालिका