औरंगाबाद : १४ मे ते २० मेपर्यंतच्या काटेकोर लॉकडाऊननंतर शहरात गुरुवारपासून ( दि. २१ ) नवे नियम लागू होणार आहेत. यानुसार लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून, आता दररोज सकाळी ७ ते दुपारी १ या वेळात अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी राहतील, असे आदेश महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ मेच्या मध्यरात्रीपासून ते २० मेच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासकीय व पोलीस यंत्रणेने घेतला होता. याची मुदत बुधवारी ( डी. २० ) संपत होती तसेच कोरोनाच्या रुग्णांचा शहरातील आकडा १०७५ झाल्याने पुढील काळातील लॉकडाऊनबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी ( दि. २१ ) पासून सुरु होणारा लॉकडाऊन काळासाठी मंगळवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नवे नियम व अटी लागू केल्या आहेत.
यानुसार २१ मे ते ३१ मेपर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सहा तासांसाठी खुली राहतील. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, फळे, दूध नागरिकांना खरेदी करता येईल. मेडिकल स्टोअर्स, औषध निर्मितीचे उद्योग या आस्थापनांची परवानगी कायम आहे. तसेच हातगाड्यांनाही परवानगी राहणार आहे. याकाळात सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.