औरंगाबाद: प्रशासनाला जनतेची साथ मिळाली तर काय घडू शकते, याची प्रचिती आज औरंगाबादेत आली. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांनी दिवसभर घरातच बसून आपले कर्तव्य पार पाडले. संपूर्ण बाजारपेठ बंद होती, रस्ते, कॉलन्या निर्मनुष्य झाल्या होत्या. कोरोनाची साखळी तोडायची, शहराला वाचवायचे असा निर्धार करूनच नागरिक लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करताना दिसून आले.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८ हजारच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक वसाहतीत रुग्ण सापडत आहेत. यामुळे औरंगाबाद शहरात आजपासून ९ दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी तेवढ्याच कडकपणे केली जात आहे. चौकचौकात पोलीस बंदोबस्त असून येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनतर्फे जाहीर केल्याप्रमाणे आज शहरातील सर्व औषधी दुकाने बंद होती. फक्त हॉस्पिटलमधील औषधी दुकानेच सुरू ठेवण्यात आली होती.
जाधववाडी धान्य मार्केट यार्ड, जुना मोंढासह, गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज, रोशनगेट, सिडको, हडको, पुंडलिकनगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, उस्मानपुरासह सर्व बाजारपेठेतील दुकाने बंद होती. यामुळे दिवसभरातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प राहिली. शहरातील २ पेट्रोलपंप वगळता बाकीचे सर्व पेट्रोलपंप बंद होते. बँकामध्ये २५ टक्केच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आले होते. बँकांचे शटर बंद होते पण आत कर्मचारी आपले काम करत होते.