औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सिद्धार्थ उद्यान मागील पाच महिन्यांपासून बंद असल्याने महापालिकेला उद्यानापासून मिळणाऱ्या एक कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. अनलॉक तीनमध्ये उद्याने उघडण्यासाठी परवानगी मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट आहे. दोन वर्षांपासून कंत्राटदारांची बिले देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसून त्यांची २८० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. लॉकडाऊननंतर महापालिकेची आर्थिक स्थिती आणखीनच बिकट झाली. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीसह इतर उत्पन्नाचे स्रोत बंद झाले.
सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयामधून महापालिकेला प्रवेश फी, वाहनतळ आणि स्टॉलभाडे यातून दरमहा काही लाख रक्कम मिळत होती. मागील पाच महिन्यांत महापालिकेला किमान एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सिद्धार्थ उद्यानाच्या पाठीमागे असलेल्या जलतरण तलावातूनही महापालिकेला दरमहा उत्पन्न मिळत होते. दुरुस्तीसाठी तलाव बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्तीचे काम संपत येत असतानाच लॉकडाऊन जाहीर झाले.
असे मिळते उत्पन्न उद्यान प्रवेश फी : जानेवारी २०२० मध्ये नागरिकांनी १६ लाख ३३ हजार रुपये मोजले. प्रवेशासाठी फेब्रुवारीमध्ये १५ लाख ५१ हजार आणि मार्चमध्ये ५ लाख ६७ हजार रुपये मिळाले.
प्राणिसंग्रहालय तिकीट विक्री : जानेवारी महिन्यात महापालिकेला २५ लाख ७ हजार रुपये मिळाले. फेब्रुवारी महिन्यात २२ लाख, तर मार्च महिन्यात ७ लाख रुपये मिळाले.