औरंगाबाद : बाजारपेठ बंद झाल्यावर दुकानाच्या ओट्यावर बसून व्यापारी गप्पा मारत बसत.... गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर चवीने चर्चा होत असे. मध्यरात्रीपर्यंत या गप्पा रंगत असत. पण कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे शहरतील ठिकठिकाणचे हे गप्पाचे अड्डे बंद पडले. आता फक्त मोबाइलवरच बोलावे लागत आहे.
पूर्वी गुलमंडीवर रात्री रंगणाऱ्या गप्पांची सर्वत्र चर्चा होत असे. त्या रात्रीच्या गप्पातून जिल्ह्यातील राजकारणाला दिशा मिळत असे. किंगमेकर दादासाहेब गणोरकर गेल्यापासून त्यांचा येथील गप्पांचा अड्डा बंद झाला. मात्र, नंतर व्यापारी गुलमंडीवरील बंद दुकानांसमोरील ओट्यावर बसून गप्पा मारत असत. ही परंपरा मागील वर्षी मार्च महिन्यापर्यंत सुरू राहिली. मोंढा, जाधववाडी येथील व्यापारीही या गुलमंडीवरील गप्पामध्ये सहभागी होत असत. रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा रंगत असत त्यात विषयाला फोडणी देण्यासाठी काही पत्रकारही अधूनमधून येत होते.
अशाच गप्पा शहागंजतील गांधी पुतळा चौकात होत असे. रात्री ९ वाजता बाजारपेठ बंद झाली की, जेवण करून सर्वजण येथील कपड्याच्या दुकानाच्या ओट्यावर बसत व विविध विषयांचे किस्से पहाटेपर्यंत गप्पा रंगत होत्या.
राजबाजार येथील संस्थान गणपती मंदिरासमोरील ओटा तर गप्पा मारण्यासाठी प्रसिद्धच होता. येथे राजबाजार मित्रमंडळ गप्पा मारत असत. त्यात काही राजकारणी येऊन सहभागी होत.
कासारी बाजारातील व्यापारीही गप्पा मारण्यात कमी नव्हते. कासारी बाजार चौकात सर्व सराफा व्यापारी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत मनसोक्त गप्पा मारत. त्यातील अनेक व्यापारी असे होते की, त्यांना येथे येऊन गप्पा मारल्याशिवाय झोप येतच नव्हती. याशिवाय बुढीलेन परिसर, शहागंजमधील बालाजी धर्मशाळा, जाधवमंडीतील जबरे हनुमान मंदिरासमोरही असा गप्पा मारण्याचा जुना अड्डा होता. अलीकडच्या काळात बिबीका मकबरा समोरील चौकात निवृत्त कर्मचारी, अधिकारी यांचा गप्पांचा फड रंगत होता. पण मागील वर्षी लॉकडाऊननंतर गप्पांचे हे अड्डे बंदच झाले. तिथे रंगलेल्या गप्पांच्या आठवणी वर्षभरानंतरही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. मोबाइलवर विषय निघाला की, आठवणी उफाळून येतात.
चौकट
पान गल्ल्याही बनल्या होत्या गप्पांचे अड्डे
शहरात मोंढा नाका, उस्मानपुरा या भागातील पानगल्लीत रात्री ९ वाजेनंतर काही व्यापारी, राजकारणी, शासकीय कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, पत्रकार यांचे गप्पाचे नवे अड्डे बनले होते. येथील गप्पांमधूनच शहरात काही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. मात्र, हे अड्डेही मागील मार्चनंतर बंद झाले.