औरंगाबाद : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक लॉकडाऊन लावला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांना ब्रेक लागला आहे. सर्वेक्षणाचे काम ठप्प झाले असून, जलकुंभांची कामे देखील बंद पडली आहेत. या योजनेवर काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांनी गाव घातले आहे.
राज्य शासनाने औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचसोबत शहरातील अंतर्गत जलवाहिनींच्या कामाचे सर्वेक्षण देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मदतीने नियुक्त खासगी कंपनीने सुरू केले. शहरात नऊ ठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून नक्षत्रवाडी येथे संतुलित जलकुंभ (एमबीआर) बांधण्याचे काम देखील सुरू झाले. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. १ मे पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्याचा परिणाम औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंग यांनी सांगितले की, संचारबंदीचा कामावर परिणाम झाला आहे. शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण केले जात होते, ते आता बंद करण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आपापल्या गावी गेले आहेत. नऊ ठिकाणी जलकुंभांची कामे सुरू होती, ही कामे देखील तूर्त बंद करण्यात आली आहेत. शहरात २३ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण होतानाच नवीन जलवाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे. संचारबंदीमुळे ही कामे देखील करता येत नाहीत. १ मेपर्यंत कामांची अशीच स्थिती राहील, असे आम्ही गृहीत धरले आहे. रुग्ण संख्या कमी झाली आणि संचारबंदीचा आदेश मागे घेतला गेला की कामांना गती येईल, असा विश्वास अजयसिंह यांनी व्यक्त केला.