वैद्यकीय शिक्षणावर मोठा परिणाम झाला
लॉकडाऊनमध्ये मागील वर्षभरापासून आमच्या ऑनलाईन तासिका घेतल्या जातात. थेट वर्गात बसून अध्ययन होत नाही. द्वितीय वर्ष हे दीड वर्षाचे असते; मात्र दोन वर्षे झाली आमचे हे वर्ष अजूनही संपलेले नाही. प्रात्यक्षिकांवर मोठा परिणाम झाला आहे. डिसेंबरमध्ये आमची परीक्षा होती. ती ४ जानेवारीला घेतली जाईल, असे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सांगितले होते. त्यामुळे सर्व विद्यार्थी कॉलेजमध्ये आले. त्यानंतर तो पेपर सातत्याने पुढे ढकलण्यात आला. २३ फेब्रुवारीला, २३ मार्च आणि आता १९ एप्रिलला होईल, असे सांगण्यात आले; मात्र त्या दिवशीही पेपर होईल, याचा भरवसा नाही. कोविडमुळे महाविद्यालयात प्रात्यक्षिक करता आले नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतच प्रात्यक्षिक शिकविले, तरच त्याचा फायदा आहे. पण ते होत नाही. लॉकडाऊनमुळे वैद्यकीय शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे.
- ऋषिकेश गित्ते, द्वितीय वर्ष, वैद्यकीय शिक्षण
मी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये आमच्या ऑनलाईन तासिका झाल्या. काही संकल्पना समजल्या नाही, तर शिक्षकांनी त्यांचे उत्तमपणे निरसन केले; परंतु प्रात्यक्षिके ऑनलाईन करता येत नाही. तसा प्रयत्न केला; पण ते ते समजत नाही. त्यासाठी लॅबमध्येच प्रात्यक्षिक झाले पाहिजेत. कोविडमुळे ते वर्षभर शक्य झाले नाही. आता इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग आहे; पण लॉकडाऊनमुळे तिथे जाता येत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे उद्योगांमध्येही बाहेरच्या व्यक्ती अथवा विद्यार्थ्यांना सहसा प्रवेश दिला जात नाही. एकूणच या साऱ्या अडचणींमुळे अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षणाचे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.
- उत्कर्षा तिरपुडे, चतुर्थ वर्ष, अभियांत्रिकी अभ्यासक्रम
शिक्षणाची दुरवस्था होऊ नये
कोरोना महामारीमुळे शिक्षणाची वाट लागली आहे. पहिल्यासारखे शिक्षण कधी सुरू होईल, याकडे आमचे लक्ष लागले आहे. गेेलेले वर्षही लॉकडाऊनमध्येच गेले. त्यानंतर आता दुसरे वर्ष सुरळीत होईल असे वाटले; परंतु तसे झालेले नाही. यंदाचे सर्व शिक्षण ऑनलाईन पद्धतीने झाले. महाविद्यालयाने घेतलेल्या ऑनलाईन तासिकांमध्ये शिकवलेले व्यवस्थित समजत नाही. मोबाइलमुळे ते बारीक दिसायचे आणि डोकं दुःखायचे, डोळ्यातून पाणी यायचे, त्यामुळे आजारपणाची लक्षणे त्यातून दिसू लागली. त्यामुळे मी व माझ्यासारखी अनेक विद्यार्थी ऑनलाईन तासिकांना हजेरी लावत नव्हतो. पण, उपस्थितीही महत्त्वाची आहे म्हणून अधूनमधून ऑनलाईन तासिकांना हजेरी लावायचो. लॉकडाऊनमुळे शैक्षणिक सत्र कालावधीमध्ये मोठा बदल झाला. ऑफलाईन पद्धतीने पहिल्यासारखे शिक्षण चालू व्हावे, शिक्षणाची दुरवस्था होऊ नये असे वाटते.
- उमाकांत पांचाळ, तृतीय वर्ष, वाणिज्य अभ्यासक्रम