औरंगाबाद : शहरातील नागरिकांनी किमान आता तरी मास्क लावून सुरक्षित अंतर पाळावे, गर्दी टाळावी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन लावावा लागेल, असे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे दिले.
स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवनाची पाहणी करण्यासाठी देसाई यांचे शहरात आगमन झाले. त्यांनी टाऊन सेंटर परिसरातील स्मृतिवनाची पाहणी केली. पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सद्याची स्थिती चिंताजनक आहे. नागरिकांना किमान आता तरी नियमांचे पालन करून लॉकडाऊन टाळला पाहिजे. शासनाला लॉकडाऊन लावून नागरिकांना त्रास देण्याची हौस नाही. मात्र, परिस्थिती असे निर्णय घेण्यास भाग पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
राठोडप्रकरणी ‘नो कॉमेंट्स’
राज्यात टिकटॉक फेम पूजा चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात ऑडिओ क्लिपही समोर येत आहेत. यात मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहेत. राठाेड प्रकरणावर देसाई यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.