छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्गाच्या कामास अखेर मुहूर्त लागला आणि नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून पुढील वर्षभरासाठी रेल्वे गेट बंद करण्यात आले. यामुळे देवळाई व सातारातील रहदारी संग्रामनगर उड्डाणपुलाकडे वळली. परिणामी, शिवाजीनगर बाजारपेठेवर दिवाळीआधी ‘संक्रांत’ आली आहे. दैनंदिन उलाढालीवर तब्बल ७० टक्के परिणाम झाला. वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा ‘लॉकडाऊन’सदृश चित्र दिसते. दिवाळीनंतर हे काम सुरू केले असते तर आम्ही वर्षभराची जगण्याची तरतूद केली असती, अशी प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
उलाढाल घटलीशिवाजीनगरात आजघडीला २०० ते २५० दुकाने आहेत. यातील ९५ टक्के दुकाने भाड्याची आहेत. भुयारी मार्गाचे काम सुरू होण्याआधी दररोज २० ते २५ लाखांची उलाढाल बाजारपेठेत होत असे. आता ३० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.- जगदीश एरंडे, कॅट, सहसचिव
ऐन दसरा-दिवाळीतच फटकाभुयारी मार्ग सुरू होण्यास दीड वर्ष लागेल. यामुळे येथील व्यापारी चार ते पाच वर्षे पाठीमागे जातील. आधी रहदारीमुळे व्यवसाय कमी झाला होता. आता रहदारी नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला.- दीपक सरोदे, इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी
नुसते खड्डे खोदून ठेवलेप्रशासनाने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंनी खड्डे खोदण्याची घाई केली; पण प्रत्यक्षात भुयारी मार्गाचे काम सुरू झाले नाही. याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. देवळाई व सातारातील मोठे ग्राहक शिवाजीनगरपासून दूर गेले.- सुधीर व्यास, व्यापारी
भाड्याची दुकाने सोडण्याचा विचारव्यवसाय घटल्याने भाडे देणेही कठीण जाणार आहे. यामुळे शिवाजीनगरातील अनेक दुकानदार जागा सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.- मधुकर नेरकर, व्यापारी
राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावादिवाळीनंतर भाड्याचे दुकान सोडणार आहे. मात्र, दुकानाचे मालक म्हणतात की, दुसरा नवीन व्यापारी आल्यानंतरच तुम्हाला डिपॉझिट परत मिळेल. या दिवाळीपर्यंत तरी प्रशासनाने काम पुढे ढकलावे, राजकीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न करावे.- विजय खरात, व्यापारी
शिवाजीनगरातील व्यापाऱ्यांच्या मागण्या१) प्रशासनाने दिवाळीपर्यंत भुयारी मार्गाचे काम थांबवून रेल्वेगेट उघडावे.२) स्थानिक राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाचे मन वळवावे.३) भुयारी मार्गाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करावे.४) काम सुरू केले, तर त्यात खंड पडू देऊ नये.५) दुकानदारांना भाड्यात सवलत द्यावी.