औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या स्तरातील लॉकडाऊनमधून सवलत मिळावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यावर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झाली आहे. काही निर्बंध ठेवून सवलत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी काय तयारी आहे, याअनुषंगाने विभागीय आयुक्तालयात थोरात यांनी शुक्रवारी बैठक घेतली व महसूल विभागातील काही अडचणी समजून घेतल्या.
कोरोनाच्या संकटामध्ये राज्यात झालेली आर्थिक घट आहे तशीच आहे. राज्याचे उत्पन्न वाढलेले नाही. जीएसटीचे अनुदान केंद्राकडून येणे बाकी आहे. शिवाय राज्यावर नैसर्गिक संकट आहे. त्याचेही परिणाम अर्थकारणावर होत आहेत. त्यामुळे सध्या व्यवहार, अर्थव्यवस्थेचा विचार करावा लागतो आहे. तिसऱ्या लाटेत जीवितहानी होऊ नये, यासाठी शासन आणि जनतेची समान जबाबदारी असणार आहे. याचा विचार करूनच सवलतींचा निर्णय होईल, असे ते म्हणाले.
चौकट...
आघाडीसाठी जे योग्य असेल ते करू
नाशिकमध्ये भाजप-मनसेची युती होणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुका एकत्र लढेल काय, यावर थोरात म्हणाले, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हे देशाच्या हिताचे आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला हवे, असे मानणारे आम्ही आहोत. काँग्रेस निवडणुकांसाठी तयार आहे. स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आघाडीसाठी जे योग्य असेल ते करू. कोरोना संपला तर सर्व निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही थोरात यावेळी म्हणाले.