औरंगाबाद : मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबादकरांना गुरुवारी पहिल्यांदाच संततधार पावसाचा अनुभव आला. बुधवारी रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली आणि गुरुवारी दिवसभर सरीवर सरी बरसत राहिल्या. श्रावण सरींनी शहर चिंब झाले. चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १४.६ मि.मी. तर एमजीएम वेधशाळेत सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत ३१.२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.
महिनाभरापासून पावसाने ओढ दिली होती. १६ ऑगस्ट रोजी पावसाचे पुनरागमन झाले. दोन दिवस थोडीशी उघडीप घेतली. मात्र, बुधवारी रात्रीपासून कधी रिमझीम तर कधी मोठ्या पावसाला सुरुवात झाली. शहरवासीयांची पहाट सुरू झाली ती पावसानेच. गुुरुवारी उशिरापर्यंत संततधार सुरू असल्यामुळे चाकरमानी व हातगाडीवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सिडको, हडको, टीव्ही सेंटर, हर्सूल, सातारा, देवळाई, चिकलठाणा, छावणी, भावसिंगपुरा, उस्मानपुरा, रेल्वे स्टेशन, गारखेडा, शिवाजीनगर अशा सर्वच भागांत पाऊस बरसत होता. दुपारी पावसाने जोर धरला. पण, काही मिनिटांतच तो ओसरला. शहरातील औरंगपुरा, जवाहर काॅलनी, आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, घाटी रुग्णालय रोडसह अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. संततधार पावसामुळे रस्त्यांतील खड्ड्यांमध्ये पाणी साचले. अशा ठिकाणाहून जाताना वाहने आदळण्याचे प्रकार होत होते. त्यामुळे वाहनांची गती मंदावली होती.
रात्री पडला ७.१ मि.मी. पाऊसचिकलठाणा वेधशाळेत बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत १.७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. बुधवारी रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ८.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. रात्री ११.३० ते गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ७.१ मि.मी. पाऊस झाला.
अशी झाली पावसाची नोंदचिकलठाणा परिसराच्या तुलनेत सिडको, हडको परिसरात काहीशा अधिक पावसाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली तर एमजीएम वेधशाळेत सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत ३१.२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
शहरात ४ दिवसांतील पाऊस (चिकलठाणा वेधशाळा)१६ ऑगस्ट - ४२.७ मि.मी.१७ ऑगस्ट - ५.६ मि.मी.१८ ऑगस्ट - १.७ मि.मी. - रात्री ११.३० वाजेपर्यंत.१९ ऑगस्ट - १४.६ मि.मी. - सायं. ५.३० वाजेपर्यंत.