औरंगाबाद : प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नऊ दिवसांच्या काळात औरंगाबादेतील उद्योगांचे जवळपास ३ हजार कोटींचे नुकसान होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत आहे. त्याला रोख लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० ते १८ जुलैदरम्यान नऊ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर उद्योग क्षेत्रात नाराजीचा सूर उमटला आहे. सततच्या खंडामुळे ग्राहकांचा विश्वास राहणार नाही. ओपन मार्केटमध्ये औरंगाबादेतील उद्योग स्पर्धेत तग धरून असताना ग्राहक दुसरे ‘सोर्स’ पाहणे सुरू करण्याची भीती आहे. लॉकडाऊनचा निर्णय दुर्दैवी आहे, असे मत ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी व्यक्त केले.
अगोदरच ४०-४५ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र ठप्प झाले होते. आता कुठे उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होते. ४०-५० टक्क्यांपर्यंत उत्पादन सुरू झाले होते. असे असताना आता आणखी नऊ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे उद्योगांची घडी विस्कटीत होईल. पुन्हा इथपर्यंत येण्यासाठी दोन आठवडे मागे जावे लागेल, अशी खंत ‘मासिआ’चे सहसचिव विनय राठी व कार्यकारिणी सदस्य मनीष अग्रवाल यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, मकरंद देशपांडे यांनी कामगारांवर आणखी बेरोजगारीचे संकट ओढवणार आहे, अशी भीती व्यक्त केली. अगोदरच उद्योगांसमोर दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संकटात आले आहेत. वेतन देण्याची क्षमता राहिलेली नाही. हजारो कामगार बेरोजगार झाले असून आता आणखी लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे रोजगाराची समस्या भेडसावणार आहे, असेही ते म्हणाले.
८० लाख मानवी तासांचे नुकसान नऊ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात दोन आठवडी सुट्या सोडल्या, तर उर्वरित ७ दिवसांत उद्योगांचे साधारणपणे ८० लाख मानवी तासांचे नुकसान होऊ शकते. औरंगाबाद व लगतच्या प्रमुख पाच औद्योगिक वसाहतींतील सर्व प्रकारच्या ४ हजार ९०० उद्योगांमध्ये १ लाख ६० हजार कामगार कार्यरत असून, सात दिवसांत सर्व शिफ्ट मिळून ते १० लाख दिवस काम करतात. प्रशासनाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. मात्र, यापुढेही सतत लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ आली, तर इथल्या उद्योग क्षेत्रावर दूरगामी परिणाम होतील. इथे उद्योग येण्याऐवजी येथे कार्यरत उद्योग बाहेर जाण्याची भीती आहे. - कमलेश धूत, अध्यक्ष, सीएमआयए