किराणा व्यवसायात, पारंपरिक व्यवहारची पद्धत होती. ग्राहक स्वतः यादी घेऊन दुकानावर येत व स्वतःच किराणा सामान घेऊन जात होते, पण मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊन यामुळे व्यवहाराची पद्धत बदलून गेली. ग्राहक दुकानावर येणे टाळू लागले. व्हॉट्सॲपवर किराणा यादी पाठवू लागले एवढेच नव्हेतर ऑनलाइन पेमेंट केले जाऊ लागले. आम्ही आमच्या व्यवसायाच्या पारंपरिक पद्धतीला ऑनलाइनची जोड दिली. लॉकडाऊनमुळे आम्ही टेक्नेसॅव्ही बनवले. आम्ही पहिले ऑनलाइन ऑर्डर घेणे सुरू केले. किराणा यादी आली की, त्या ग्राहकांच्या घरापर्यंत किराणा सामान पोहचविण्यासाठी नोकर नेमले. काही दुकानदारांनी दोन ते तीन वर्षे आधीच सुरू केले होते, पण मागील वर्षीपासून याचे प्रमाण वाढले. काही व्यापाऱ्यांच्या नवपिढीने यापुढे जाऊन स्वतःचे वेबसाइट सुरू केले. ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला. त्यांच्या ग्राहकांना दुकानात आलेल्या नवीन वस्तूचे फोटो त्याची माहिती व किंमत त्यावर टाकणे सुरू केले. यामुळे कठीण काळात ही व्यवसायाला गती मिळाली. आज ६० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहक ऑनलाइन किराणा यादी पाठवित आहेत. ५० टक्के ग्राहक आता ऑनलाइन पेमेंट करत आहेत. यासाठी तंत्रज्ञानात आम्ही अपग्रेड झालो. हेच लॉकडाऊनने आम्हाला शिकवले. कोरोनाशी सामना करताना लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत व्यवसाय कमी झाला असे म्हणून रडत न बसता टेक्नेशिव होऊन पारंपरिक व्यवसायला आधुनिक तंत्रज्ञानची कशी सांगड घालायची व व्यवसाय वाढवायचा हेच मागील वर्षीत आम्ही शिकलो.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे दुकाने बंद होते. व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरनेही कठीण झाले होते. या परिस्थितीपासून धडा घेत आम्ही कर्ज कमी घेण्याचे ठरवले. ऑनलाइन व्यवहारामुळे उधारी कमी झाली.
येणारे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कसे व्यवसायाला वाढवायचे याकडे आम्ही लक्ष देत आहे. औरंगाबादेत दर महिन्याला १००पेक्षा अधिक व्यापारी ऑनलाइन पोर्टल सुरू करत आहेत. जे ग्राहक दुकानात येतात तेही मास्क लावून व सॅनिटायझर हातावर मारल्यावरच येतात. थेट कोणत्याही वस्तूला हात लावत नाहीत. ग्राहकांच्या मानसिकतेत हा बदल झाला.
श्रीकांत खटोड
किराणा व्यापारी