लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड: चोरट्यांनी गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून आतील तब्बल सव्वा सात लाख रुपयांचा माल चोरुन नेला. ही घटना ७ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते ८ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नवीन नांदेडातील सिडकोच्या मोंढा परिसरात घडली.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन चोरट्यांनी ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ८ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नांदेडच्या सिडको परिसरातील नवीन मोंढा मार्केटमधील मोहमद इरफान यांच्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडले. त्याचवेळी चोरट्यांनी मोहमद इरफान यांच्या गोदामात प्रवेश करुन आतील काजू, जिरे, शहाजिरा, सोप, खोबरा व लवंग आदी किराणा साहित्य व मॉनिटर असा एकूण तब्बल ७ लाख २५ हजार ३०० रुपयांचा माल चोरुन नेला. या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी फस्के, पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, पोउपनि. कल्याण नेहरकर व पोउपनि. स्वाती कावळे आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी व्यापारी मोहम्मद इरफान मो. फारुख यांनी दिलेल्या तक्रारी आधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे नांदेड ग्रामीण ठाण्यातील विशेष शोधपथकापुढे पुन्हा एक आव्हान उभे राहिले आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी एकाच रात्री सिडकोतील तीन पानटपºया फोडून माल लंपास केला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
शटरचे कुलूप तोडून लाखोंचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:31 AM