औरंगाबाद : धावत्या औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन १४ बोगींना सोडून पुढे गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी औरंगाबादेतील शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ घडली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
औरंगाबाद रेल्वेस्टेशवरून रवाना झाल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जात नाही तोच कंपलिंग निघाल्याने इंजिन बोगींपासून तुटले आणि पुढे गेले. प्रकार लक्षात येताच रेल्वे चालकाने इंजिन थांबविले. तोपर्यंत इंजिन बऱ्याच पुढे गेले होते. हा प्रकार रेल्वे अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर इंजिन पुन्हा मागे आणून बोगींना जोडून रेल्वे रवाना करण्यात आली.
वेटिंग तिकिटांवरच प्रवास करण्याची वेळपरभणी, नांदेड, मुंबई, नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जात आहे. सचखंड एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसह बहुतांश रेल्वेत प्रवाशांची चांगलीच गर्दी होत आहे. जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळे वेटिंग तिकिटांवरच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.
जनरल तिकिटांअभावी गैरसोयप्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या नंदीग्राम, तपोवन, देवगिरी, राज्यराणी, मराठवाडा एक्स्प्रेसला जनरल तिकिटाची सुविधा नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. केवळ दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी धावणाऱ्या रेल्वेत जनरल तिकीट देण्यात आले. त्याविषयी संताप व्यक्त होत आहे.