औरंगाबाद : लोकसभेच्या औरंगाबाद व जालना मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार निवडणूक लढतील व उमेदवारीसंबंधीचा पक्षश्रेष्ठी घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य राहील. तसेच जालना मतदारसंघात मी व डॉ. कल्याण काळे यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही दोघांनी एकमेकांचे प्रचार प्रमुख बनून एकमेकाला निवडून आणण्याची हमी घेत आहोत, असे आज येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
काँग्रेसच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण यांचेही नाव असू शकते, असे सांगायलाही सत्तार विसरले नाहीत. हे नाव चालेल का, असे विचारता पक्षश्रेष्ठींनी त्यांना काँग्रेसचे तिकीट दिल्यास का नाही चालणार, असा सवाल केला.
आ. सुभाष झांबड हे माझे चांगले मित्र आहेत. पण मध्यंतरी मी बुथ कमिट्यांच्या प्रश्नावरून नाराज होतो, असे नमूद करून स्पर्धेत त्यांचे नाव पुढे आहे. नामदेव पवार यांचेही नाव आहे, असे त्यांनी नमूद केले. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून प्रा. रवींद्र बनसोड यांचे नाव घेतले जात होते. परंतु आज सत्तार म्हणाले, हे नाव आता मागे पडले आहे. त्यांना गंगापूर विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचे आश्वासन देण्यात आले आहे.
मला किंवा सत्तार यांच्यापैकी जालन्याचे तिकीट कुणालाही मिळो आम्ही यावेळी विजयश्री खेचून आणणारच आहोत, अशी ग्वाही दिली. सुभाष झांबड म्हणाले, माझे आणि अब्दुल सत्तार यांचे वैयक्तिक भांडण नाही. औरंगाबादचे तिकीट मला मिळाल्यास जिंकून आणण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून सत्तार यांचीच राहील.नामदेव पवार, किरण पा. डोणगावकर, डॉ.पवन डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते पत्रपरिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना लोकसभा यावेळी काँग्रेसच जिंकेलरावसाहेब दानवे यांना आम्ही चकवा देणारच. आम्हाला अर्जुन खोतकर यांचीही साथ मिळेल, असे भविष्य सत्तार यांनी वर्तविले. येत्या १५ मार्चपासून आम्ही सोयगावपासून प्रचारास सुरुवात करीत असल्याचे जाहीर करून सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे लक्षात आले.
मतांपासून वंचित राहीलवंचित बहुजन आघाडीसंदर्भात प्रश्न विचारला असता, अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीच मतांपासून वंचित राहील. काँग्रेस आघाडीवर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. सारे मुस्लिम एमआयएमचे गुलाम नाहीत. औरंगाबादच्या एमआयएमच्या नेत्यांना हैदराबादेत चपराशासारखी वागणूक मिळते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.