औरंगाबाद : जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज रात्री आमखास मैदानावर आपल्या समर्थकांचा कौल घेतला. त्यांना तीन प्रश्न विचारले. लोकसभा निवडणूक लढवू का? या प्रश्नावर उत्तर आले, हो... दुसरा प्रश्न विचारला की, काँग्रेसतर्फे लढवू का? यावर उत्तर आले, हो... आणि तिसरा प्रश्न विचारला अपक्ष लढू का? उत्तर आले... नाही, नाही! या प्रश्नांनंतर सत्तार यांनी भाषणच थांबवले. समर्थकांनी जो निर्णय दिला त्यावर कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. इथेच सभा संपवली व शेवटी आभारही कुणी मानले नाहीत.
गेली अनेक दिवस येणकेण प्रकारेण अब्दुल सत्तार हे माध्यमांमध्ये झळकत आहेत. चर्चेत आहेत; परंतु माझा बॉल आता समर्थकांच्या कोर्टात गेला आहे. त्यांचा कौल घेऊन व त्यानंतर माझा अंतरात्मा काय बोलतो, त्यानुसार निर्णय घेईन, असे सत्तार यांनी जाहीर केले होते. आता कौल मिळाला आहे.
या सभेत अशोक मगर, संजय जगताप, अफसर खान, दुर्गाबाई शेजवळ, पंकजा माने, गुलाब पटेल, जीतसिंग करकोटक, इलियास किरमाणी, शेख जमील अहमद, मुजाहेद पटेल, प्रा. समाधान गायकवाड, डॉ. शोएब हाशमी आदींची भाषणे झाली. मंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, माजी नगरसेविका मेहरुन्निसाबेगम (मोटेभाभी) यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
जलील यांनी सिल्लोडला येऊन लढावे एमआयएमचे धोरण नसतानाही इम्तियाज जलील औरंगाबादची लोकसभा कशासाठी लढत आहेत? खैरे जिंकावेत यासाठी का? लोक सर्व समजत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पुढच्या वेळेसची विधानसभा सिल्लोडहून लढवून दाखवावी. नाही तर मी औरंगाबाद मध्यमधून लढून दाखवतो. खैरे आणि संविधानाचा काही संबंध नाही. जाती-धर्माच्या नावावर ते राजकारण करतात. मला जनतेचा सेवक म्हणून काम करायचे आहे. गेल्या वीस वर्षांत केलेली पाच कामे खैरेंनी सांगावीत, असे आव्हान सत्तार यांनी यावेळी दिले.
रामकृष्णबाबांचे बोल... काँग्रेसने चुकीचा उमेदवार दिला आहे. जिल्ह्यात सत्तार यांच्यामुळे काँग्रेस टिकून आहे. सत्तार यांनी खासदार व्हावे ही जनतेची इच्छा आहे आणि काँग्रेसने त्यांनाच तिकीट द्यावे, जिंकून आणण्याची जबाबदारी माझी राहील. यापूर्वीही मी त्यांना खूप मदत केली आहे, अशा शब्दांत माजी खासदार रामकृष्णबाबा यांनी भावना व्यक्त केली. खैरे काय माणूस आहे का? या त्यांच्या वाक्याने हास्यकल्लोळ झाला. मागील काही निवडणुकांचा आढावा घेत ते इतिहासात रममाण झाले आणि अजूनही माझ्यात तीच धमक आहे, असे बजावले. मागच्या वेळी मी मुस्लिम बांधवांमुळे खासदार झालो होतो, असे त्यांनी नमूद केले. पक्षश्रेष्ठींशीच चर्चा करणार...सभा संपल्यानंतर पत्रकारांनी सत्तार यांना गाठले. ते म्हणाले, मी काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढवावी, असा कौल अधिक असल्याने आता मी काँग्रेसच्या दिल्लीतील व मुंबईतील नेत्यांशी चर्चा करीन. माझा अंत:करणातील नेता, जो नांदेडमध्ये बसला आहे, त्याच्याशी चर्चा करीन आणि मग निर्णय घेईन.
इम्तियाज जलील व खैरेंवर टीकेची झोड... आजच्या सभेत सत्तार यांनी काँग्रेस पक्ष, काँग्रेसची श्रेष्ठी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण काँग्रेसचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांच्यावर कुठेही टीका केली नाही. उलट एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील व शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांना त्यांनी टीकेचे लक्ष्य केले. पाकिस्तानने भारताचे चाळीस अतिरेकी मारले, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य निषेधार्ह असून, त्यांनी भारतीय सैनिकांचा मोठा अपमान केला आहे; पण ते असे बोलले तरी काही नाही. आम्ही बोललो असतो तर देशद्रोही ठरलो असतो, अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी नोंदवली.