औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात व्हावी, यासाठी पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी बुधवारी येथे पोलीस आयुक्तालयात घेतला. समाजकंटकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक अत्यंत पारदर्शक व्हावी, याकरिता निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. आयोगाच्या निर्देशाने प्रत्येक पोलीस परिक्षेत्राची जबाबदारी अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे सोपविण्यात आली. त्यानुसार औरंगाबाद परिक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड या मतदारसंघाची जबाबदारी एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली. परिक्षेत्रातील चार मतदारसंघांतील निवडणुकीसाठी पोलिसांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कुलकर्णी हे दौऱ्यावर आहेत.
बुधवारी त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर एमपीडीए, हद्दपारीची कारवाई केल्याचे सांगितले. शिवाय मारहाण, लुटमार आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या सुमारे ९१२ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. सीआरपीसी ११० कलमानुसार १६० जणांवर गुंडा कारवाई करण्यात आली.
मतदान केंद्रांचे सादरीकरण शहरातील एकूण मतदान केंद्रांची संख्या, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती सादर करण्यात आली. निवडणुकीसाठी उपलब्ध पोलीस बळ आणि बंदोबस्तासाठी मागविण्यात आलेले राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांची माहिती यावेळी सांगण्यात आली. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात केलेल्या कारवाईची माहिती दिली. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी समाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.