औरंगाबाद : खैरेंच्या भेटीनंतर वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुक न लढण्याची भूमिका आज पत्रकार परिषदेत जाहीर केली. हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर करत आपण मतदार जनजागृती करणार आल्याची माहिती दिली.
शुक्रवारी निवडणुकीच्या अनुषंगाने शांतीगिरी महाराजांनी दोन उमेदवारी अर्ज घेऊन औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासाठी संकेत दिले होते. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड, अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांनी आजवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराजांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहोत.
खैरेंच्या भेटीनंतर झाला निर्णय शांतिगिरी महाराज यांनी युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची आज सकाळी भेट झाली. यानंतर हिंदू मतदानाचे विभाजन होऊ नये यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले.
२००९ ला लढवली होती निवडणूक शांतीगिरी महाराज यांनी २००९ ला औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. यात १ लाख ४८ हजार २६ मते घेत त्यांनी काँग्रेसला पराभवाकडे नेले तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले होते. ही मते निर्णायक ठरली होती. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार आहे.
वर्षभरापासून मठात नेत्यांची हजेरी मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्रेहभोजनही घेतले. महाराजांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. नाशिक, जळगाव, औरंगाबादपैकी कुठेही त्यांना विचार झाला नाही.