औरंगाबाद : शहरातील एका हौशी मतदाराने मतदान करीत असल्याची मोबाईलवर क्लीप तयार करून ती टिकटॉक, व्हॉटस्अॅप या सोशल मीडियावर व्हायरल केली. याबाबत वृत्त वाहिन्यांवर बातमी प्रकाशित होताच, शहर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली. मतदान हे गोपनीय आहे. गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल व्हिडिओ तयार करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
बोगस मतदानाच्या संशयावरून एक ताब्यातसिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाकीर हुसेन शाळेतील मतदान केंद्रात एक तरुण बोगस मतदान करण्यासाठी उभा असल्याचा संशय उमेदवारांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, आपण मतदान करण्यासाठी आलो आहोत, आपण बोगस मतदान केले नाही, असे त्याचे म्हणणे होते. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.
सोशल मीडियातून गोपनीयतेचा भंगसोशल मीडियातून अनेक मतदारांनी कुणाला मतदान केले, त्याची माहिती फेसबुकवर टाकून मतदान गोपनीयतेचा भंग केला. जिल्हा व राज्य पातळीवरील समितीकडे याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केला, त्यांना सोशल मीडियातून ट्रेस करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तत्पूर्वी, समितीमार्फत याबाबत चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
पोलिसांच्या उपाययोजना आल्या कामीलोकसभा मतदारसंघात मंगळवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे कोठेही अनुचित घटना घडली नाही. प्रखर उन्हामुळे मतदारांनी सायंकाळी मतदान केंद्रावर गर्दी केल्याने रांगेत थांबलेल्या प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रात्री ८.३० वाजले.
औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.२३) सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान शांततेत व्हावे, याकरिता पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे सकाळी ७ वाजताच घराबाहेर पडले होते. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्यासह अन्य अधिकारी सतर्क होते. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात होते. यामुळे कोणतीही गडबड झाली नाही. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत आज संपूर्ण शहरात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले.