औरंगाबाद : ‘लोकांच्या मनात काही तरी खदखदतेय... परिवर्तनाची सुप्त लाट आलेली आहे,’ असे सूचक वक्तव्य आज येथे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जालना रोडवर आकाशवाणीसमोर हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
त्यांनी सांगितले की, ३२ वर्षे ‘यांना’ आपण वाढू दिले. आता तर यांनी जाहीरच करून टाकले की, शहराला आठ दिवसांनंतर पाणी येईल. कचऱ्याच्या प्रश्नाने किती उग्र रूप धारण केले, हे आपण साऱ्यांनीच अनुभवले आहे. शहराचा व जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. आता बदल गरजेचा आहे. तो आपण करूया.
यावेळी माजी खासदार उत्तमसिंग पवार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, माजी मंत्री अनिल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, माजी उपमहापौर तकी हसन, शेतकरी स्वाभिमान संघटनेचे चंद्रशेखर साळुंके पाटील, पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या सूर्यकांता गाडे आदींची भाषणे झाली. प्रारंभी, उमेदवार सुभाष झांबड यांनी प्रास्ताविक केले. ‘चला, बदल घडवू या’ असा नारा त्यांनी दिला.
मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. श्रीहरी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. माजी मंत्री गंगाधर गाडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, मानसिंग पवार, सुधाकर सोनवणे, प्रकाश मुगदिया, छाया जंगले पाटील, फैय्याज कुरेशी, अॅड. सय्यद अक्रम, डॉ. जितेंद्र देहाडे, इब्राहिम पठाण आदींची उपस्थिती होती.
गांधी-नेहरू घराण्याचा अभ्यास करून बोलास्वातंत्र्यासाठी पं. जवाहरलाल नेहरू यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे देशासाठीचे बलिदान सर्वश्रुत आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच जिवापाड झटत असतात. असे असतानाही पंतप्रधान त्यांच्यावर टीका करीत सुटले आहेत, हे निषेधार्ह होय, असे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी नमूद केले.