- विजय सरवदे
औरंगाबाद : सेनेने प्रत्येक वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकली, तरीही काँग्रेसने सेनेला प्रत्येक निवडणुकीत कडवी झुंज दिली. प्रामुख्याने काँग्रेसचे पारंपरिक मतदार हे मुस्लिम व दलित आहेत. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून ‘एमआयएम’ हा पक्ष औरंगाबादेत स्थिरावला.
औरंगाबाद- मध्य विधानसभा मतदारसंघात या पक्षाचे इम्तियाज जलील हे निवडून आले. महानगरपालिकेतही या पक्षाचे २४ नगरसेवक आहेत. अलीकडे, राजकीय पटलावर वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे ‘सुप्रीमो’ आहेत. औरंगाबादसह राज्यातील विविध शहरांमध्ये या आघाडीच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ सभा झाल्या आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ‘एमआयएम’चे जलील हे उमेदवार आहेत. आतापर्यंत सतत काँग्रेसच्या बाजूने उभ्या असलेल्या दलित- मुस्लिम मतदारांचा कल यावेळी कोणाकडे, हेच निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात ४ लाख १८ हजार मुस्लिम मतदार, सव्वादोन लाख दलित मतदार आणि साडेपाच-सहा लाख ओबीसी मतदार आहेत.
औरंगाबाद शहरावर संपूर्ण लक्ष !इम्तियाज जलील हे मूळचे औरंगाबादचे रहिवासी असले, तरी त्यांचा शहराबाहेर फारसा संपर्क नाही किंवा त्यांचा ग्रामीण मतदारांसोबत फारसा परिचयदेखील नाही. त्यामुळे ते प्रामुख्याने शहरातील दलित, मुस्लिम आणि काही प्रमाणात ओबीसींची मते खेचतील आणि नेमके हेच काँग्रेससाठी त्रासदायक ठरू शकते. असा कयास काढला जातो की, शेवटच्या टप्प्यात प्रकाश आंबेडकर आणि असदोद्दीन ओवेसी यांची येथे सभा झाली, तर वंचित बहुजन आघाडीला फायदा होऊ शकतो.