औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर सर्व उमेदवारांनी २४ तारखेला स्वत:ला एकदम तणावमुक्त अनुभवले. प्रमुख चार उमेदवारांसह सर्व २३ उमेदवार निवांत झाले. आता प्रतीक्षा आहे निवडणूक निकालाची. १० मार्च आचारसंहिता लागल्यानंतर २३ एप्रिल रोजी मतदान होईपर्यंत सर्व उमेदवार तणावात असल्याचे वातावरण होते. या निवडणुकीत प्रमुख उमेदवार असलेल्या शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांनी आपापल्या विजयाचा दावा ‘लोकमत’जवळ व्यक्त केला.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांनी निवासस्थानी पूजा करून शिर्डी मतदारसंघातील उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी प्रस्थान केले. महायुतीचे उमेदवार खा. खैरे यांनी दावा केला, मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर चांगल्या प्रमाणात मतदान झाले आहे. मतदारांनी भरूभरून मतदान केले असून विजयश्री १०० टक्के मिळेल. - खा. चंद्रकांत खैरे
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांनीही कुटुंबियांसमवेत दिवस घालविला. ते म्हणाले की, मला ग्रामीण व शहरी भागात मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यावेळी कधी नव्हे एवढे जाती- पातीचे राजकारण घडले. पण आमचे धोरण विकासाचे होते. आता मी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे आभार मानणार आहे.- आ. सुभाष झांबड
एमआयएमचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांनी बुधवारी मालेगाव येथील लोकसभा उमेदवाराच्या प्रचाराकरिता हजेरी लावण्यासाठी औरंगाबाद सोडले. आ. जलील म्हणाले, मतदारांनी जो काही कौल दिला असेल तो २३ मे रोजी समोर येईल. कार्यकर्ते अंदाज बांधत असतात. मी अंदाज वगैरे काही बांधलेला नाही. जे होईल ते पाहू या. - आ. इम्तियाज जलील
अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी एका कॉफी शॉपवर निवांतपणे कॉफी घेत मित्र परिवार आणि काही निवडक कार्यकर्त्यांसोबत मतदानाचा आढावा घेतला. आ. जाधव म्हणाले की, काय होईल ते बघू या. निवडणूक संपली आहे. मतदारांनी मतदान केले आहे. मतदारांनी काय निर्णय घ्यायचा होता तो घेतला आहे. २३ मे रोजी मतदारांचा कौल कळेल. - आ. हर्षवर्धन जाधव