औरंगाबाद : कोणत्याही पक्षाचा कोणताही उमेदवार जिंकून आला तरी जोपर्यंत मतदारांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लोकशाही पद्धती खऱ्या अर्थाने उपयोगात आली, असे म्हणता येत नाही. त्यामुळेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील काही महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
उत्तम नागरी सुविधांची गरज-समांतरचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला; पण आजही औरंगाबादकरांना पाण्यासाठी झुंजावे लागते. पाणीपुरवठा अल्प असून, अनियमित आहे. नियमितपणे टॅक्स भरूनही आज मुबलक पाणी नाही. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती आहे. यासोबतच रस्ते हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे उत्तम नागरी सुविधा निर्माण करून देणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे.- मंजूषा कोरंगळीकर
पर्यटन स्थळांचा विकास व्हावा-औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, पर्यटन स्थळांचा अधिकाधिक विकास करून या मार्गे रोजगार निर्मिती करण्यासाठी लोकप्रतिनिधी इच्छुक नाहीत. परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून परदेशी चलन मोठ्या प्रमाणात शहरात येऊ शकते आणि अनेक उद्योगांना चालना मिळू शकते. म्हणून इतर अनेक गोष्टींबरोबरच लोकप्रतिनिधींनी पर्यटनाकडेही लक्ष द्यावे.- ऊर्मिला मगर
महिला सुरक्षितता महत्त्वाची-महिला मतदार अत्यंत जागरूकपणे मतदान करतात; पण लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या सुरक्षेचा विचार अजिबात केला जात नाही. सकाळचे दहा असो की रात्रीचे दहा. महिला, तरुणी अजिबात सुरक्षित नाहीत. घराबाहेर पडलेली स्त्री सुरक्षितपणे घरी येऊ शकेलच याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. लोकप्रतिनिधींनी महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. - अलका अमृतकर
प्रदूषणावर तोडगा आवश्यकप्रदूषित शहरांच्या यादीमध्ये औरंगाबाद शहराचे नाव बरेच आघाडीवर आहे. प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस अशीच वाढत राहिली, तर लवकरच प्रत्येकाला आॅक्सिजन मास्क लावून फिरावे लागेल. वृक्ष लागवड आणि कचरा या दोन गोष्टींवर प्रामुख्याने काम व्हायला हवे. लोकप्रतिनिधींना जनता साथ देईलच; पण आधी त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.- निशी अग्रवाल
कचरा प्रश्नावर तोडगा हवाऔरंगाबादचा कचरा प्रश्न आता केवळ शहरापुरताच मर्यादित न राहता जागतिक पातळीवर चर्चिला गेला आहे. वर्ष उलटून गेले तरी हा प्रश्न अजूनही पुरता सुटलेला नाही. आजही अनेक परिसरांमध्ये कचऱ्याच्या गाड्या अनियमित येतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढणारा आणि कचऱ्यापासून औरंगाबादकरांची मुक्तता करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. काहीच काम न करताही आपण निवडून येऊ शकतो, असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. - नीला रानडे