- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएमने हिसकावून घेतल्यानंतर विद्यमान आमदार इम्तियाज जलील हे संभाव्य उमेदवार राहतील, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वत: जलील यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी लोकसभेऐवजी विधानसभाच लढणार असल्याचे आज ‘लोकमत’जवळ स्पष्ट केले. आता एमआयएमची उमेदवारी कुणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
ही जागा एमआयएमला सुटावी यासाठी जलील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हैदराबाद गाठून एमआयएमचे सुप्रिमो असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. एक आमदार व २५ नगरसेवक असलेल्या पक्षाने निवडणूक न लढणे कसे चुकीचे ठरेल, हे त्यांनी पटवून दिले. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची नावे असलेल्या यादीतील माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे नाव ३७ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कटले. त्यांतर अॅड. बाळसाहेब आंबेडकर यांनी ही जागा एमआयएम लढवेल, असे घोषित केले.
एमआयएमतर्फे आ. इम्तियाज जलील हे लोकसभा निवडणूक लढणार, असे जाहीर झाल्यानंतर विविध तर्कवितर्क सुरू झाले. मुस्लिम समाजातही खळबळ उडाली. मुस्लिम समाजातील बुद्धिजीवी वर्गाने जलील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवायला सुरुवात केली. एमआयएमचे कार्यकर्तेही जलील यांनी विधानसभाच लढवावी, असा आग्रह धरू लागले.
एमआयएमने देशभरात लोकसभा निवडणुका लढवायच्याच नाहीत, असा धोरणात्मक निर्णय झाला होता. मुस्लिम धर्मगुरूंनीही तशीच सूचना ओवेसी यांना केली होती. त्यामुळेच ओवेसी यांनी, बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुका लढवण्यासंबंधीचे अधिकार वंचित बहुजन आघाडीला देत एमआयएम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली होती. असे असतानाही औरंगाबादच्या जागेचा आग्रह एमआयएमने धरला. औरंगाबादसह मुंबईतील एक जागा एमआयएम लढेल, असे जाहीर झाले. लोकसभा लढल्यास तुम्ही मोदींना मदत करीत आहात, असा संदेश जाईल, म्हणून अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी ओवेसींना हितोपदेश केला होता, हे येथे उल्लेखनीय.
एमआयएम व वंचित बहुजन आघाडीत मनोमिलन नाही
खरे तर एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी असतानाही या दोन पक्षांत म्हणावे तसे मनोमिलन किंवा एकीची भावना बळावलेली दिसत नाही. औरंगाबादच्या वंचित बहुजन आघाडीत जिल्हा कार्यकारिणीवरून धुसफूस सुरू झाली आहे. सुनील वाघमारे यांनी नेमलेल्या कार्यकारिणीवर अनेकांनी अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण यांनी नुकतीच सुवर्णशिल्पमध्ये झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. एमआयएमला जागा सुटली असली तरी वंचित बहुजन आघाडीचा एखादा उमेदवार येथे उभा राहू शकेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.