औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात तरी कोणत्याही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.
सर्वच पक्ष उमेदवारांची अंतिम चाचपणी करताना चाचपडताहेत अशीच स्थिती मंगळवारी बहुतेक ठिकाणी होती. पुन्हा त्यातच उमेदवारी अर्ज करण्याच्या मुदतीतच या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या आयाराम- गयारामांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे
औरंगाबादेत होळीनंतरच प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंविरुद्ध आघाडीतर्फे कोण लढणार; हे अद्यापही नक्की ठरत नाही. एमआयएमने स्वतंत्र उमेदवार दिल्यास वंचित बहुुजन आघाडीत फूट पडण्याची चिन्हे आहेत.
नांदेडला ५१ जणांनी ९३ अर्ज नेले. फक्त एका अपक्षाने अर्ज दाखल केला. लातूरला १५ जणांनी ३८ अर्ज दाखल केले. पण एकानेही दाखल केला नाही. तीच गत परभणी व बीडची. जालन्यात दानवे यांच्याविरुद्ध आघाडीतर्फे कोण; हे अजूनही स्पष्ट नाही.
गोंधळाचे वातावरणएकंदरीत काय, तर उमेदवारांची चाचपणी करताना बहुतेक सारेच पक्ष चाचपडताहेत आणि दुसरीकडे इतर पक्षांतील संभाव्य उमेदवारांनाच आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी निष्ठावान उमेदवार बंडखोरी करणार आणि मतदारांसमोरील पर्यायही अधिक वाढणार, असे गोंधळाचे वातावरण सध्या आहे.