Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात दिग्गजांचे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 02:41 PM2019-03-26T14:41:00+5:302019-03-26T14:42:08+5:30

अशोक चव्हाण, प्रीतम मुंडे यांची उमेदवारी दाखल; युती, आघाडीसह वंचित आघाडीचे उमेदवार मैदानात

Lok Sabha Election 2019: In Marathwada veterans filled forms for lok sabha! | Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात दिग्गजांचे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल!

Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात दिग्गजांचे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल!

googlenewsNext

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, बीडमधून प्रीतम मुंडे यांच्यासह लातूर, परभणी हिंगोली आणि उस्मानाबादमधून युती, आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी अर्ज दाखल केले. प्रतिष्ठितांकडून उमेदवारी दाखल झाल्याने लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

41 अर्ज नांदेडमध्ये दाखल; चव्हाण, चिखलीकरांसह २६ उमेदवारांचा समावेश
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २५ मार्च रोजी २६ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अमिता चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर, समाजवादी पार्टीचे अब्दुल समद अब्दुल करीम तसेच वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. १५ अपक्ष उमेदवारांनीही २० अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत १४१ उमेदवारांनी २९१ उमेदवारी अर्ज नेले आहेत. 

09 उमेदवारांचे अर्ज हिंगोलीत दाखल; वानखेडेंचा प्रतिनिधीमार्फत अर्ज
हिंगोली लोकसभा मतदारसंघात ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांनी प्रतिनिधीमार्फत अर्ज भरला. तर इंडियन युनियन मुस्लिम लिगतर्फे चाऊस शेख जाकेर शेख, अल्ताफ अ.एकबाल अ.,  बहुजन वंचित आघाडीतर्फे नारायण रामा पाटील, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे कोंडिबा गौणाजी मस्के, अपक्ष गंगाधर दादाजी बलकी, गंगाधर रामराव सावते, जयवंता विश्वंभर वानोळे, संदेश चव्हाण यांचा समावेश आहे. २६ रोजी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 

लातुरात भाजप आमदार समर्थकाची बसपाकडून उमेदवारी
लातूरमध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. विनायकराव पाटील यांचे खंदे समर्थक असलेले भाजपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी  सोमवारी अचानक बसपा व सपाकडून अर्ज दाखल करीत बंडाचा झेंडा फडकाविला आहे. दरम्यान, लातूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी भाजपकडून सुधाकर शृंगारे, सिद्धार्थ सूर्यवंशी (बसपा), अरुण सोनटक्के (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), रमेश कांबळे (अपक्ष) या चौघांनी अर्ज दाखल केले. ज्यामध्ये भाजपा उमेदवार शृंगारे यांचा एक अर्ज असला तरी ते उद्या शक्तीप्रदर्शनासह अन्य एक अर्ज दाखल करतील. काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामंत, भाजपचे सुधाकर शृंगारे आणि वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर हे शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत.

10 उमेदवारांचे १३ अर्ज परभणीत दाखल; जाधव, विटेकर यांचा समावेश
परभणी लोकसभा मतदारसंघातून सोमवारी १० उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत़ सोमवारी शिवसेनेचे संजय जाधव, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे राजन क्षीरसागर यांच्यासह १० जणांचे १३ अर्ज दाखल झाले़ त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांनी भारिप बहुजन महासंघाकडून २ तर वंचित  बहुजन आघाडीकडून २ असे ४ अर्ज दाखल केले़


17 जणांचे २९ अर्ज बीडमधून दाखल; प्रीतम मुंडे , बजरंग सोनवणे यांचा समावेश
बीड : बीड लोकसभा मतदार संघातून सोमवारी विविध पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकले. दिवसभरात १६ उमेदवारांनी २८ उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे दाखल केले.  या निवडणुकीत शुक्रवारपर्यंत एकच नामनिर्देशन दाखल झाले होते. सोमवारी भाजपच्या वतीने विद्यमान खा. डॉ. प्रितम गोपीनाथराव मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री महादेव जानकर आदींसोबत जाऊन उमेदवारी दाखल केली. तर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने बजरंग मनोहर सोनवणे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेसह जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेससह मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत उमेदवारी दाखल केली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा. विष्णू जाधव यांनीही  स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन उमेदवारी दाखल केली. सोमवारपर्यंत एकूण १७ उमेदवारांचे २९ अर्ज दाखल झाले. डॉ. प्रीतम मुंडे यांनी ४ तर बजरंग सोनवणे यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. 


10 जणांकडून उस्मानाबादेत  अर्ज दाखल; राणा पाटील, राजेनिंबाळकरांचा समावेश 
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत एकूण १० जणांनी १२ अर्ज दाखल केले आहेत़ सोमवारी शिवसेनेकडून ओम राजेनिंबाळकर यांनी दोन अर्ज दाखल केले़ तर राष्ट्रवादीकडून राणाजगजितसिंह पाटील यांनी एक अर्ज दाखल केला़ उर्वरित ८ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे़ त्यात आर्यनराजे शिंदे, मनोहर पाटील, विश्वनाथ फुलसुरे, सुशिलकुमार जोशी, विष्णू देडे, तुकाराम गंगावणे व वंचित बहुजन आघाडीचे अर्जून सलगर यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे़ तर नवनाथ उपळेकर यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले आहेत़

Web Title: Lok Sabha Election 2019: In Marathwada veterans filled forms for lok sabha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.