औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात एमआयएमकडून उतरलेले आ.इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे बंडखोर सिल्लोडचे आमदार तथा अपक्ष उमेदवार अब्दुल सत्तार यांची मालमत्ता कोट्यवधींच्या घरात असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रातून दिसते आहे. सत्तार यांच्या तुलनेने जलील यांची मालमत्ता कमी आहे. तर सत्तार यांची मालमत्ता काही कोटींच्या घरात आहे. या दोन्ही आमदारांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेचे कुटुंबियांचे विवरण उमेदवारी अर्जसोबत सादर केले.
आ.जलील यांच्याकडील मालमत्ता आ.जलील यांची जंगम संपत्ती ५१ लाख ३४ हजार ७६८ एवढी आहे. तर स्थावर संपत्ती १ कोटी ८० लाख आहे. त्यांच्यावर ६८ लाख रुपयांचे कर्ज असून, त्यांच्याकडे डस्टर, टाटा सफारी या चारचाकी तर बुलेट, सुझुकी अॅक्सेस या दुचाकी आहेत. त्यांच्याकडे सोने नाही. मात्र पत्नी रुमी फातेमा यांच्याकडे २ लाख ७० हजार रुपये कि मतीचे ८० ग्राम सोने असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. पत्नी रुमी फातेमा यांची एकूण संपत्ती ६३ लाख ३२ हजार ७६८ रुपये दाखविण्यात आली आहे. गुंतवणुकीत बंधपत्रे, शेअर्स, ठेवी, एफडीचा समावेश आहे. त्यांच्या हाती ५५ हजार तर पत्नीच्या हाती २५ हजार रोख रक्कम आहे. दोन मुले आणि आईकडे एकूण १४ हजार रोख असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. आमदार मानधन हेच उत्पन्नाचे स्रोत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आ. सत्तार यांच्याकडील मालमत्ता काँग्रेसचे बंडखोर आ.सत्तार यांच्याकडे ३ कोटी ६९ लाख ९३ हजार ९४१ जंगम संपत्ती आहे. तर स्थावर संपत्तीचा आकडा ८ कोटी ३९ लाख ९६ हजार ८९१ रुपयांचा आहे. सत्तार व पत्नी नफिसा बेगम यांच्यावर १ कोटी ९८ लाख ८२ हजारांचे कर्ज असल्याचे त्यांनी दाखविले आहे. फॉर्च्युनर, टाटा सफारी, ट्रॅक्टर ही वाहने त्यांच्याकडे आहेत. सोने ३५ तोळे ५ ग्रॅम, चांदी २५ तोळे कुटुंबियांकडे असून, त्याची किंमत १० लाख ६५ हजार ८०० रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. पत्नी नफिसा बेगम यांची एकूण संपत्ती ६ कोटी ९९ लाख ६ हजार ५१ रुपये आहे. गुंतवणुकीत बंधपत्रे, शेअर्स, ठेवी, एफडीचा समावेश आहे. त्यांच्या हाती २३ लाख तर पत्नीच्या हाती २८ लाख रोख रक्कम आहे. आमदार मानधन, व्यवसाय, शेती, व्याज उत्पन्नाचे स्रोत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.